गोदावरीला दुसऱ्यांदा पूर, दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पाणी... नाशिकमधील धडकी भरवणारी दृश्य
मान्सून महाराष्ट्रात सक्रीय होऊन काही दिवसच उलटलेले आहेत. अशातच नाशिकमधील गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. ज्यामुळे पंचवटी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर

नाशिकमधील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

रामकुंडांतील दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पुराचं पाणी
नाशिक: नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील दुसरा पूर आला आहे. गंगापूर धरणातून वाढता पाण्याचा विसर्ग आणि जोरदार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे, तर नाशिक महानगरपालिकेने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन केले आहे.
पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग
नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, निफाड आणि बागलाण तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला आहे. शुक्रवार (20 जून) पासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. त्यातच आज पंचवटी परिसरात असलेल्या दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पूराचं पाणी आलं आहे. यामुळे या संपूर्ण परिसरातील मंदिरं, दुकानं आणि बाजारपेठ ही पाण्याखाली गेली आहे.
- 20 जून: 1,160 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
- 21 जून: 2,320 क्यूसेक
- 22 जून: 3,944 क्यूसेक
- 23 जून: 6,160 क्यूसेक
सोमवारी (23 जून) दुपारी 2 वाजता गंगापूर धरणातून 6,160 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले, ज्यामुळे गोदावरी नदीला दुसरा पूर आला. याशिवाय, दारणा धरणातून 1,100 क्यूसेक, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 3,228 क्यूसेक आणि इतर धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हे ही वाचा>> Rain Update: जगबुडीचा कहर, रत्नागिरी गेलं पाण्याखाली.. पुराचं पाणी पाहून तुम्हालाही भरेल धडकी
पूरस्थितीचा परिणाम
मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातील सखल भागात पाणी साचले असून, रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे रामकुंड, गोदा घाट आणि दुतोंड्या मारुती परिसरात पाणी शिरले आहे. दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीइतके पाणी लागले असून, गोदा काठावरील अनेक मंदिरे आणि छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या बाजार परिसरात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली आहे.