Viral Video: रस्त्यावरच कोंबड्या खरेदी केलेल्या ट्रक मालकाला अनंत अंबानींनी किती पैसे दिले?
Anant Ambani Hens Viral Video: आपल्या पदयात्रे दरम्यान अनंत अंबानी यांनी कोंबड्यांनी भरलेला ट्रक तात्काळ खरेदी केला. ज्यासाठी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

Anant Ambani chickens Video: जामनगर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी आपल्या जामनगर ते द्वारका या 140 किलोमीटरच्या पायी यात्रेदरम्यान एका ट्रकमधील 250 कोंबड्यांना वाचवण्यासाठी ट्रक मालकाला पैसे दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 1 एप्रिल 2025 रोजी घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनंत अंबानी यांच्या या कृतीने त्यांच्या प्राणीप्रेमाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
अनंत अंबानींनी नेमक्या कुठे खरेदी केल्या कोंबड्या?
अनंत अंबानी हे आपल्या 30व्या वाढदिवसानिमित्त जामनगर येथील आपल्या निवासस्थानापासून द्वारकाधीश मंदिरापर्यंत पायी यात्रा करत आहेत. ही यात्रा त्यांनी 28 मार्च 2025 रोजी सुरू केली होती आणि दररोज रात्री 10-12 किलोमीटर अंतर कापत ते पुढे सरकत आहेत. 1 एप्रिल रोजी, जेव्हा ते जामनगर-द्वारका महामार्गावरून चालत होते, तेव्हा त्यांना एक ट्रक दिसला, ज्यामध्ये 250 कोंबड्या होत्या आणि त्या कत्तलखान्यात नेण्यात येत होत्या. प्राणीप्रेमी असलेल्या अनंत अंबानी यांनी तात्काळ हा ट्रक थांबवला आणि ट्रक मालकाशी बोलणी केली.
हे ही वाचा>> अनंत अंबानींनी कोंबड्यांचा संपूर्ण ट्रकच का घेतला विकत... काय आहे कारण?
व्हायरल व्हिडिओमध्ये अनंत अंबानी एका कोंबडीला हातात धरून आपल्या टीमला गुजरातीमध्ये सूचना देताना दिसले. ते म्हणाले, "हा बद्दू बचावीले... हा बद्दू लेयले. मालिकनी पैसा देदे," म्हणजेच "या सर्व कोंबड्या वाचवा, त्या खरेदी करा आणि मालकाला पैसे द्या." त्यांनी या कोंबड्यांसाठी मालकाला बाजारभावा एवढी किंमत देऊन त्या खरेदी केल्या असल्याचं बोललं जात आहे.
या कोंबड्या आता अनंत अंबानी यांच्या वंतारा या प्राणी संरक्षण केंद्रात पाठवण्यात आल्या आहेत, जिथे त्यांची काळजी घेतली जाणार आहे.









