Irshalwadi Landslide : निसर्गासमोर टेकले हात! जिथे झाला मृत्यू, तिथेच होणार अंत्यसंस्कार, कारण…
गेल्या काही तासांपासून इर्शाळगड भागात संततधार पाऊस सुरू असून, पावसातच बचाव कार्य सुरू होतं. पण, पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा दरड कोसळण्याची भीती, तसेच रात्री रेस्क्यू करणं शक्य नसल्याने प्रशासनाने मदत व बचाव कार्य थांबवण्याचा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT

Irshalwadi Landslide Deaths : 19 जुलैची रात्र इर्शाळवाडीसाठी काळरात्र ठरली. 50 घरांचं गाव 20 फूट मातीच्या ढिगाराखाली गाडलं गेलं. 218 लोकवस्तीच्या ठाकर समुदायाच्या या वाडीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. एका रात्रीत इर्शाळवाडीचे अवशेष शिल्लक राहिले असून, आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. पण, त्यांच्यावरही आता जिथे मृत्यू झाला, तिथेच अंत्यसंस्कार करण्याची परिस्थिती ओढवलीये. अत्याधुनिक यंत्रणा असूनही प्रशासनाला निसर्गसमोर हात टेकवावे लागलेत.
खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या कुशीत इर्शाळवाडी वस्ती. मुख्य रस्त्यापासून वर जायचं म्हणजे दोन टेकड्या पार करून जाव्या लागतात. इर्शाळवाडीत जाणं किती कठीण याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान परिषदेत दिली आणि बचाव कार्य करणं किती आव्हानात्मक आहे, तेही सांगितलं.
इर्शाळवाडी हे इर्शाळगडाच्या डोंगरात वसलेले गाव असून, सरळ चढण असल्याने केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेली किंवा व्यक्तीच अशा ठिकाणी जाऊ शकते. त्यामुळे मदत कार्यासाठी आलेल्या काही जणांना त्रास सुरू झाल्यानं अर्ध्या वाटेतूनच खाली पाठवण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत बोलताना दिली होती.
वाचा >> Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!
हे गाव इतके उंचावर आहे की, दोन डोंगर चढून तिथे पोहोचावं लागतं. त्यामुळे आता ठिकाणी जे मृतदेह सापडले आहेत. त्यांना खाली आणणे अशक्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बचाव व मदत कार्य करताना जवानांनी आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत.