मुंबईची खबर : 1 सप्टेंबरपासून मुंबईकरांच्या खिशाला कात्री! टॅक्सी अन् रिक्षाचे भाडे वाढणार
परिवहन प्राधिकरणाने मुंबईतील टॅक्सींसाठी 2 रुपये आणि महानगर प्रदेशात चालणाऱ्या ऑटो-रिक्षांसाठी 1 रुपये भाडेवाढ मंजूर केली आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्याने सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : 1 सप्टेंबरपासून मुंबईकरांच्या खिशाला कात्री!
टॅक्सी अन् रिक्षाचे भाडे वाढणार
Mumbai News : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने गेल्या बुधवारी झालेल्या बैठकीत सीएनजीवर चालणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. यामुळे 1 सप्टेंबरपासून मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) टॅक्सी आणि रिक्षाचा प्रवास महागणार आहे. प्राधिकरणाने टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपये तर रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयाची वाढ केली आहे.
दरवाढ कशी करण्यात आली?
नवीन दरपत्रकानुसार, टॅक्सीचे पहिल्या 1.5 किलोमीटरसाठीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये झाले असून प्रति किलोमीटर दर 20.66 रुपयांवरून 21.90 रुपये करण्यात आला आहे. तर, रिक्षाचे किमान भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये झाले असून प्रति किलोमीटर दर 17.14 रुपयांवरून 18.22 रुपये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वाहतूक भाडे पुनर्रचनेसाठी गठित केलेल्या चार सदस्यीय 'खटुआ समिती'च्या शिफारशींनुसार हे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : 'अदाणी-अंबानीच्या हातात गणपती देऊन, आम्ही गरबा बघायचा का?', मनसे नेते लालबाग आणि चिंतामणी मंडळावर संतापले!
मीटर कॅलिब्रेशनची अट
महाराष्ट्र परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीतील निर्णयानुसार, चालकांना त्यांच्या वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक मीटरचे कॅलिब्रेशन (री-कॅलिब्रेशन) करून घेतल्यावरच नवीन भाडे वसूल करण्याची परवानगी असेल. मीटर कॅलिब्रेशन पूर्ण करण्यासाठी चालकांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ठरवून दिलेल्या वेळेत कॅलिब्रेशन न करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : Personal Finance: बाजार कोसळला म्हणून SIP थांबवणार? जरा थांबा अन्...
18 महिन्यांनंतर भाडेवाढ
सुमारे 18 महिन्यांच्या कालावधीनंतर ही भाडेवाढ करण्यात आली असून, यापूर्वी 1 फेब्रुवारी 2025 रोजी टॅक्सी आणि रिक्षाच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ झाली होती. मुंबई महानगर क्षेत्रात 4.5 लाखाहून अधिक रिक्षा आणि 50 हजारांपेक्षा जास्त काळ्या-पिवळ्या टॅक्सी धावतात, ज्यातील बहुतांश वाहने सीएनजीवर चालतात. दरम्यान, राज्य सरकारकडून सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या प्रभुत्वाची तपासणी मोहीम देखील राबवली जात आहे.
