दोन कोटींची मागणी, 46 लाख स्विकारताना रंगेहात पकडलं, 'लाचसम्राट' पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ
Pune Crime : या प्रकरणातील एका संशयिताला मदत करण्याच्या मोबदल्यात उपनिरीक्षक चिंतामणी यांनी त्या आरोपीच्या वकिलाकडे थेट दोन कोटी रुपयांची लाच मागितली असा गंभीर आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन कोटींच्या लाचेची मागणी, 46 लाख स्विकारताना रंगेहात पकडलं
'भोसरी'चा पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ
Pune Crime : पिंपरी-चिंचवड पोलिस दलात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झालेल्या उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय 35, रा. भोसरी) याला त्वरित शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
जानेवारी 2025 मध्ये चिंतामणी यांची पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागात (EOW) नियुक्ती झाली होती. विभागाकडे चार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा एक महत्त्वाचा गुन्हा तपासासाठी प्रलंबित होता. या प्रकरणातील एका संशयिताला मदत करण्याच्या मोबदल्यात उपनिरीक्षक चिंतामणी यांनी त्या आरोपीच्या वकिलाकडे थेट दोन कोटी रुपयांची लाच मागितली असा गंभीर आरोप आहे.
हेही वाचा : सप्तशृंगी गडावर निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 800 फूट खोल दरीत कार कोसळली, 6 जणांचा दुर्दैवी अंत
तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली आणि चिंतामणी यांना मागणी केलेल्या रकमेपैकी 46 लाख 50 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेनंतर पोलिस दलातील अंतर्गत चौकशी सुरू झाली. पदाचा गैरवापर, गैरकृत्ये आणि सरकारी सेवकाकडून अपेक्षित प्रामाणिकतेचा भंग झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.










