बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी बेदरकारपणे वागणारा इशित नेमका आहे तरी कुठला?
केबीसी 17 मधील इशित भट्ट सध्या सोशल मीडियावर बराच ट्रोल होत आहे. पण इशित भट्ट नेमका कुठला आहे आणि केबीसीमध्ये नेमकं काय घडलं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

मुंबई: लोकप्रिय क्विझ शो 'कौन बनेगा करोड़पति' (KBC) सीझन 17 च्या बाल स्पेशल एपिसोडने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. या शोमध्ये इशित भट्ट याला होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी बोलण्याच्या पद्धतीमुळे नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. इशितचा अतिआत्मविश्वास आणि काहीसा उद्धट वाटणारी वागणूक प्रेक्षकांना आवडली नसल्याने सोशल मीडियावर त्याच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान, अमिताभ बच्चन यांचा एक नवा ट्विट देखील व्हायरल झाला आहे.
नेमका कुठला आणि कोण आहे इशित भट्ट?
इशित भट्ट हा 10 वर्षांचा मुलगा असून, तो गुजरातच्या गांधीनगरमधील एका शाळेत इयत्ता पाचवीत शिकतो. केबीसीच्या बाल स्पेशल एपिसोडमध्ये हॉट सीटवर बसलेल्या इशितने सुरुवातीपासूनच आपला अतिआत्मविश्वास दाखवला. एपिसोड सुरू होताच, अमिताभ बच्चन यांनी नियम (रूल्स) समजावून सांगण्यापूर्वीच इशितने त्यांना थांबवले आणि 'मला रूल्स माहीत आहेत, त्यामुळे तुम्ही मला आता रूल्स समजावू नका' असे स्पष्टपणे सांगितले. हे वाक्य ऐकून स्टुडिओमधील लोकंही आवाक् झाले, तर अमिताभ बच्चन यांनी शांतपणे कार्यक्रम पुढे सुरू ठेवला. नंतरच्या प्रश्नांमध्येही इशितने ऑप्शन्स देण्यापूर्वीच उत्तर लॉक करण्याची मागणी केली आणि 'सर, एक काय, त्यात चार लॉक लावून द्या, पण लॉक करा' असे म्हणत अतिआत्मविश्वास दाखवला.
एपिसोडमध्ये इशितने सुरुवातीचे काही प्रश्नाची उत्तरं पटापट दिली, जी बरोबर सुद्धा आली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास गरजेपेक्षा जास्त वाढला. पण जेव्हा पाचवा म्हणजेच 25,000 रुपयांच्या प्रश्न आला तिथे तो गडबडला. हा प्रश्न रामायणाशी संबंधित होता – 'वाल्मिकी रामायणात प्रथम कांडचं नाव काय आहे?' हा प्रश्न विचारताच इशित शांत झाला. आधीच्या चार प्रश्नांना पर्याय देखील सांगू नका असं म्हणणारा इशित गप्प बसला. नंतर काही वेळाने त्याने अमिताभ यांच्याकडे ऑप्शन मागितले.
हे ही वाचा>> VIDEO : केबीसीमधील स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्याशी उर्मटपणे बोलला, अतिआत्मविश्वास नडला, 5 व्या प्रश्नाला बाहेर
ऑप्शन पाहिल्यानंतर इशितचा अतिआत्मविशास पुन्हा एकदा उफाळून आला. त्याने या प्रश्नाचे अयोध्या कांड असं उत्तर दिलं. ते देखील अतिआत्मविशासाने. पण हीच गोष्ट त्याला नडली. कारण त्याचं उत्तर सपशेल चुकीचं होतं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे बाल कांड असं होतं. अवघ्या पाचव्या प्रश्नाचंच उत्तर चुकल्याने इशितला खेळ सोडावा लागला आणि तो देखील एकही रुपया न कमावता.