Mahesh Landge: पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची आताच मागणी का होतेय?
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी केली आहे. नव्या जिल्ह्याला शिवनेरी असे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे या मागील कारणांची आणि राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
BJP MLA Mahesh Landge : पुण्याचं विभाजन होणार का असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली. या मागणीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यावर अनेक जिल्ह्यांच्या विभाजनाच्या मागण्या आमच्याकडे आहे त्यावर एकत्रित विचार करावा लागेल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. पण, आताच पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी का पुढे आलीये?
ADVERTISEMENT
पुणे जिल्हाचं क्षेत्रफळ 15 हजार 643 इतकं आहे. राज्यात पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याची झपाट्याने वाढ झाली आहे. आयटी पार्क, एमआयडीसी आणि नोकरीच्या संधींमुळे पुण्यातल्या लोकसंख्येत दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात 4 लोकसभेचे मतदारसंघ आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक महत्त्वामुळे पुणे नेहमीच चर्चेत असतं. त्याचबरोबर पुण्याला लागून ठाणे, रायगड, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा असे जिल्हे आहेत. त्यामुळे देखील पुणे एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं.
हेही वाचा >> ‘हा भाजपचा पिढीजात धंदा’; शिवसेनेनं (UBT) डिवचलं, फडणवीसांवर टीकेचे बाण
गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ पुणे शहरच नाही तर जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणावर स्थलांतर झालं आहे. 2011 च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या 94 लाख 29 हजार 408 इतकी होती. अर्थात गेल्या 13 वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या पुणे जिल्हा प्रशासनावर त्याचा ताण येत असल्याचं चित्र आहे.
हे वाचलं का?
पिंपरी चिंचवड हे शहर औद्योगीकरणासाठी ओळखलं जातं. त्यामुळे कामाच्या निमित्ताने या भागात येण्याऱ्यांची संख्या वाढती आहे. रहिवासी नागरिकांची संख्या देखील गेल्या काही काळामध्ये मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावं, अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीवरुन पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय देखील करण्यात आले होतं. त्याच धर्तीवर आता पुणे जिल्ह्याचं देखील विभाजन करण्यात यावं अशी मागणी जोर धरु लागली आहे.
पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्यामागची कारणं काय?
सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमध्ये असताना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली. त्याचबरोबर नवीन जिल्ह्याला शिवनेरी नाव देण्यात यावं, असं देखील ते म्हणाले. ही मागणी करण्यामागे काही कारणं दिली जात आहेत. ती कारणं म्हणजे, पुणे जिल्ह्याचा वाढता विस्तार. पुणे जिल्ह्याचा विस्तार वाढतोय. सर्व प्रशासकीय कामांसाठी पुण्यात जावं लागतं. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावं आणि शिवनेरी हा नवा जिल्हा करावा, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडला स्वतंत्र तालुका म्हणून निर्मिती करावी अशी देखील मागणी लांडगे यांनी केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Devendra Fadnavis: लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार?, फडणवीसांचं मोठं विधान
पुण्याच्या विभाजनाच्या मागणीमध्ये पुणे जिल्ह्याचा वाढता विस्तार हा एक भाग आहेच. त्याचबरोबर यामध्ये अनेक राजकीय गणितं देखील आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दोन लोकसभेचे मतदारसंघ येतात. एकीकडे मावळ मतदारसंघ आहे तर दुसरीकडे शिरुर मतदारसंघ आहे.
ADVERTISEMENT
मावळमध्ये शिवसेनचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत तर शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांचं आमदार म्हणून वजन वाढलं आहे. येत्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका देखील आहेत त्यामुळे शिरुर मतदारसंघातून लोकसभेची जागा लढवण्याची लांडगे यांची इच्छा असू शकते असं म्हंटलं जातं. त्याचबरोबर नवीन जिल्ह्याची मागणी करुन मतदारांवर देखील त्याचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न लांडगे यांचा असू शकतो.
BJP MLA Mahesh Landge, Shivneri district : विभाजनामागे राजकारण?
आता नवीन जिल्हा झाला तर त्यात नवीन प्रशासकीय यंत्रणा असणार त्याचबरोबर नवीन पालकमंत्री देखील नेमावा लागणार, असं झाल्यास लांडगे यांना नवीन जिल्ह्याचा पालकमंत्री देखील होण्याची संधी आहे. त्यातच सध्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महेश लांडगे यांच्यात काही अनबन आहे का अशा देखील चर्चा आहेत. कारण जेव्हा लांडगे यांनी नव्या जिल्ह्याची मागणी केली तेव्हा ‘महेश लांडगे यांचं भाषण ऐकताना वाटलं, ते वेगवेगळ्या मागणी करताना मुंबईचा समुद्रही पिंपरीला अशी मागणी करतात की काय?’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
तर तिकडे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील महेश लांडगे यांच्यावर टीका केली आहे. ‘पुणे जिल्ह्याची विभागणी करुन, शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती करुन सर्व सामान्यांच्या जीवनमानावर काही फरक पडणार आहे का? की हे केवळ राजकीय मागणी आहे?’ असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ‘शिवनेरी नावाला विरोध नाही फक्त मागणीमागची व्यवहार्यता तपासायला हवी’ असं कोल्हे यांनी सूचित केलं.
हेही वाचा >> पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी, खासदार अमोल कोल्हे यांचं मोठं स्टेटमेंट
आता शिवनेरी नवा जिल्हा झाला आणि महेश लांडगे त्या लिह्याचे येत्या काळात पालकमंत्री झाले तर पिंपरी चिंचवड आणि शिरुर लोकसभा मतदारसंघावर ते पकड मिळवू शकतात. त्यामुळे या भागात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या ताकदीवर त्याचा फरक पडू शकतो. सध्या तरी लांडगेंच्या या मागणीवर कुठलाही विचार झाला नसला तरी येत्या काळात पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास त्याचा मोठा राजकीय परिणाम झालेला पाहायला मिळू शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT