Mahesh Landge: पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची आताच मागणी का होतेय?
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी केली आहे. नव्या जिल्ह्याला शिवनेरी असे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे या मागील कारणांची आणि राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

BJP MLA Mahesh Landge : पुण्याचं विभाजन होणार का असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली. या मागणीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यावर अनेक जिल्ह्यांच्या विभाजनाच्या मागण्या आमच्याकडे आहे त्यावर एकत्रित विचार करावा लागेल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. पण, आताच पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी का पुढे आलीये?
पुणे जिल्हाचं क्षेत्रफळ 15 हजार 643 इतकं आहे. राज्यात पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याची झपाट्याने वाढ झाली आहे. आयटी पार्क, एमआयडीसी आणि नोकरीच्या संधींमुळे पुण्यातल्या लोकसंख्येत दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात 4 लोकसभेचे मतदारसंघ आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक महत्त्वामुळे पुणे नेहमीच चर्चेत असतं. त्याचबरोबर पुण्याला लागून ठाणे, रायगड, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा असे जिल्हे आहेत. त्यामुळे देखील पुणे एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं.
हेही वाचा >> ‘हा भाजपचा पिढीजात धंदा’; शिवसेनेनं (UBT) डिवचलं, फडणवीसांवर टीकेचे बाण
गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ पुणे शहरच नाही तर जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणावर स्थलांतर झालं आहे. 2011 च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या 94 लाख 29 हजार 408 इतकी होती. अर्थात गेल्या 13 वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या पुणे जिल्हा प्रशासनावर त्याचा ताण येत असल्याचं चित्र आहे.
पिंपरी चिंचवड हे शहर औद्योगीकरणासाठी ओळखलं जातं. त्यामुळे कामाच्या निमित्ताने या भागात येण्याऱ्यांची संख्या वाढती आहे. रहिवासी नागरिकांची संख्या देखील गेल्या काही काळामध्ये मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावं, अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीवरुन पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय देखील करण्यात आले होतं. त्याच धर्तीवर आता पुणे जिल्ह्याचं देखील विभाजन करण्यात यावं अशी मागणी जोर धरु लागली आहे.