swadichha sane : सेल्फी घेतली अन्...; मिठ्ठू सिंगने दिली हत्येची कबूली

swadichha sane missing case latest update: पालघर येथील एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या स्वदिच्छा सानेची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मिठ्ठू सिंग याला अटक केलीये...
 swadichha sane missing case update : Mithu Singh confesses to murder of Swadichchha Sane
swadichha sane missing case update : Mithu Singh confesses to murder of Swadichchha Sane

-दीपेश त्रिपाठी, मुंबई

जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि पालघर येथे राहणाऱ्या सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ अखेर उलगडलं. स्वदिच्छा सानेची हत्या झाल्याचं समोर आलं असून, पोलिसांनी या प्रकरणात मिठ्ठू सिंग याला अटक केली आहे. मिठ्ठू सिंग याने स्वदिच्छा सानेची हत्या केल्याची कबूली दिली आहे. या प्रकरणात स्वदिच्छा सोबतचा शेवटचा सेल्फी महत्त्वाचा ठरला.

एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणारी स्वदिच्छा साने 14 महिन्यापूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला असून, जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या मिठ्ठू सिंगला अटक करण्यात आली आहे.

स्वदिच्छा साने हत्या प्रकरण : 29 नोव्हेंबर 2021 रोजी काय घडलं होतं?

29 नोव्हेंबर 2021 रोजी वैद्यकीय शिक्षण घेणारी स्वदिच्छा साने ही सकाळी 9.58 वाजता विरार स्टेशनवरून लोकल ट्रेनने निघाली होती. ती पूर्व परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडली होती. परीक्षा दुपारी असल्यानं ती आधी अंधेरीला उतरली आणि नंतर वांद्रेला आली. वांद्रेला उतरून स्वदिच्छा साने रिक्षाने बॅण्डस्टॅण्डला पोहोचली होती.

स्वदिच्छा सानेच्या कुटुंबियांनी पोलिसांत केली तक्रार

29 नोव्हेंबर 2021 रोजी परीक्षेसाठी गेलेली स्वदिच्छा घरी परतलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी स्वदिच्छाचा शोध घेतला. ती कुठेच सापडत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. स्वदिच्छा सापडत नसल्यानं तिच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा संशय व्यक्त केला होता.

दरम्यान, सुरूवातीला जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला. स्वदिच्छाबद्दल काहीच आढळून न आल्यानं या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला. स्वदिच्छा साने बेपत्ता होण्यापूर्वी कुठे होती, ते ठिकाण शोधलं. सदिच्छाचं शेवटचं लोकेशन वांद्रे येथील बँड स्टॅन्ड होतं. नंतर तिच्या कुटुंबियांनी वांद्रे पोलीस ठाण्यातही धाव घेतली. गुन्हे शाखा युनिट 9 ने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

संशयित मिठ्ठू सिंगने भेट आणि बोलणं झाल्याची दिली कबूली

पोलिसांनी सांगितलं की, स्वदिच्छा बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. त्याची चौकशी करण्यात आली. त्याने स्वदिच्छा सानेसोबत बोलणं झाल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी भादंवि 363 (अपहरण) आणि 364 (ई) (खंडणीसाठी अपहरण) प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

मिठ्ठू सिंगने हत्या केल्याची दिली कबूली

स्वदिच्छा साने ही शेवटची बॅण्ड स्टॅण्ड येथे दिसली होती. तिथे पोलिसांनी चौकशी केली. मिठ्ठू सिंगने स्वदिच्छासोबत सेल्फी घेतलेला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने स्वदिच्छा सानेची हत्या केल्याची कबूली दिली. स्वदिच्छाची हत्या करून मृतदेह बॅण्डस्टॅण्ड येथील समुद्रात फेकल्याचं मिठ्ठू सिंगने सांगितलं. स्वदिच्छासोबत सेल्फी घेतल्यानंतर मिठ्ठू सिंगने हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

कोण हे आहे मिठ्ठू सिंग? (Who is mithu singh)

मिठ्ठू सिंग हा वांद्रेतील बॅण्डस्टॅण्ड परिसरात मिट्स किचन नावाने फूड स्टॉल चालवत होता. फूड स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत तो सेल्फी काढायचा आणि तो सोशल मीडियावर शेअर करायचा. त्यामुळेच आपला फूड स्टॉल प्रसिद्ध झाल्याचं त्याने म्हटलं होतं. त्याने सुरुवातीला अनेक लोकांसोबतच्या सेल्फी पोलिसांना आणि स्वदिच्छा सानेच्या आईवडिलांना दाखवले होते.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in