'संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेचा खून?', संपूर्ण प्रकरण जसंच्या तसं
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची हत्या करण्यात आली का? असा गंभीर सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी संबंधित एका महिलेचा खून झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी ट्वीट देखील केलं आहे. या ट्वीटमुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाला नवं वळण मिळालं असून, या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. दमानिया यांच्या दाव्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे.
अंजली दमानियांचं ट्वीट काय आहे?
अंजली दमानिया यांनी एक सविस्तर ट्वीट करत या प्रकरणातील नव्या घडामोडींचा खुलासा केला. त्यांनी लिहिलं, “गुंड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या? संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळंब शहरातील द्वारका नगरमध्ये राहणारी ही महिला होती. तिची 7 ते 8 दिवसांपूर्वी हत्या झाल्याचं कळतंय. दरवाजा तोडून बीड पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेह सडलेला असल्याने जागेवरच पोस्टमॉर्टेम करून अंत्यविधी उरकण्यात आले.”
दमानिया यांनी हा दावा करताना असा संशय व्यक्त केला की, ही हत्या संतोष देशमुख प्रकरणातील काही धागेदोरे लपवण्यासाठी किंवा तिच्या स्वतःच्या अनैतिक संबंधांमुळे झाली असावी. त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
हे ही वाचा>> संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
“कुठल्या कारणाने हत्या झाली? बीड पोलिसांना ही बातमी कळली आणि ते घटनास्थळी पोहोचले, त्यानंतरच स्थानिक पोलिसांना आणि रहिवाशांना याची माहिती मिळाली.” असं म्हणत दमानिया यांनी पोलिसांच्या तपासावरही बोट ठेवत, याबाबत अधिकृत माहिती का समोर येत नाही, असा सवाल केला आहे.










