पुण्यातील ससून रुग्णालयाच्या 10 व्या मजल्यावरुन तरुणाची उडी मारुन आत्महत्या, 10 दिवसांपूर्वीच पोलिसांनी वाचवलेले प्राण
Pune Crime : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणाने आयुष्य संपवलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या 10 व्या मजल्यावरुन तरुणाची उडी

10 दिवसांपूर्वीच पोलिसांनी वाचवले होते तरुणाचे प्राण
Pune Crime : पुण्यातील ससून रुग्णालयातून मोठी बातमी समोर आलीये. ससून रुग्णालयाच्या 10 व्या मजल्यावरुन एका तरुणाने उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून हा तरुण मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असून त्याला रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विजय असं तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे.
मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने मनोरुग्ण विभागात उपचार
अधिकची माहिती अशी की, पुण्यातल्या ससून रुग्णालयात गुरुवारी (दि.25) सकाळी एका तरुणाने दहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. मृत तरुणाचं नाव विजय असल्याचं समोर आलं आहे. त्याला 5 सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करताना ताब्यात घेतले होते. मानसिक अस्थिरतेमुळे त्याला रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांत खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की 5 सप्टेंबर रोजी विजय रेल्वे रुळांवर उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी रेल्वे पोलिसांनी त्याला थांबवले. पोलिसांनी अडवल्यानंतरही तो सतत आत्महत्या करणार असल्याचे सांगत होता. त्याची मानसिक अवस्था बिघडलेली असल्याने त्याला ससून जनरल रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अखेर या तरुणाने गुरुवारी सकाळी ससून रुग्णालयात टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वजण हादरले आहेत. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या विजयने रुग्णालयाच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेत जीव दिला.
पोलिसांकडून तरुणाच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न
विजयने गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रुग्णालयाच्या दहाव्या मजल्यावरील वॉर्डच्या खिडकीतून उडी घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की मृत तरुणाच्या कुटुंबाविषयी माहिती गोळा केली जात आहे. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही या घटनेनंतर प्रश्न निर्माण झाले आहेत, कारण रुग्णावर देखरेख असतानाही त्याने एवढ्या उंचावरून उडी मारली. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की मृत तरुणाच्या कुटुंबाचा शोध लागल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.