Sharad Mohol: ‘मुळशी पॅटर्न’ ज्यावरुन आला त्या ‘मोहोळ गँग’चा रक्तरंजित इतिहास! A टू Z स्टोरी…
Mohol Gang and Mulshi Pattern: मुळशी पॅटर्न ज्यावरुन आला त्या मोहोळ गँगचा पुण्यात नेमका उदय कसा झाला, काय आहे त्यांचा रक्तरंजित इतिहास जाणून द्या सविस्तरपणे…
ADVERTISEMENT
Mulshi Pattern: निलेश झालटे, पुणे: कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ ज्याच्या नावानं भल्याभल्यांचा थरकाप उडायचा. तो शुक्रवारी 5 जानेवारी 2024 रोजी कोथरूड परिसरातील सुतारदरा भागातून जात होता. त्यावेळी अचानक त्याच्या सुरक्षारक्षकांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. गोळीबारानंतर शरद मोहोळला तातडीने कोथरूड परिसरातच असलेल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. मात्र, उपचारादरम्यान शरद मोहोळनं शेवटचा श्वास घेतला. शरद मोहोळच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळीयुद्ध संपलं की सुरु झालं हा खरंतरं मोठा सवाल आहे. मात्र ही रक्तरंजित ‘मुळशी पॅटर्नची’ स्टोरी सुरु होण्याचा इतिहास तितकाच भयंकर आणि अंगावर काटा आणणारा आहे. मुळशी पॅटर्न ज्यावरुन आला त्या मोहोळ गँगचा रक्तरंजित इतिहास काय आहे. या गॅंगवारची सुरुवात कशी झाली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सविस्तर… (sharad mohol sandip mohol bloody history of the mohol gang in pune from which the movie mulshi pattern came)
ADVERTISEMENT
‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा काही वर्षांपूर्वी चर्चेत होता. या सिनेमात पुण्यातल्या गुन्हेगारी टोळया, अर्थकारण त्याच्याशी संबंधित असलेले राजकारण या सगळ्या घटकांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले होते. मुळशी पॅटर्न हा सिनेमा नव्हता तर ते जळजळीत वास्तव होतं, एक स्टेटमेंट होतं. पण मुळशी पॅटर्न या सिनेमाचा जो नायक होता किंवा काही जणांसाठी जो खलनायक होता राहुल पाटील उर्फ राहुल्या याची भूमिका ज्या व्यक्तीवर बेतली होती त्याचीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुणे अन् टोळी युद्ध..
90 च्या दशकात पुणे शहर आणि आसपासचे तालुके हे कात टाकत होते. पुणे म्हणजे पेन्शनरचे शहर, पुणे म्हणजे सायकलींचे शहर ही ओळख जाऊन या शहराची नवी ओळख बनत होती. पुणे हे नवे आयटी हब बनत होते. आंतरराष्ट्रीय कंपन्या शहरात येत होत्या अर्थातच यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार होऊ लागले होते.
हे वाचलं का?
जमिनी या सोन्यापेक्षा महाग झाल्या होत्या. पुणे शहर जसं वाढत गेलं तसंतसे पुण्याच्या पंचक्रोशीत ज्यांच्या जमिनी होत्या ते अल्पावधीत कोट्याधीश झाले. पैसा आला तशी सत्ता आली, राजकारण आले, हितसंबंध आले, हितसंबंध जपण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आणि याच स्पर्धेतून जन्म झाला तो पुण्यातल्या गँगवॉरचा, भाई लोकांचा आणि मुळशी पॅटर्नचा…
हे ही वाचा>> Gangs of Pune: Sharad Mohol च नाही तर ‘हे’ होते पुण्यात दहशत माजवणारे टॉप 10 गँगस्टर
या भाईगिरीचा, दादागिरीचा आणि वर्चस्वाच्या संघर्षातून पहिला खटका पडला तो 2005 मध्ये… मारणे टोळीतल्या अनिल मारणे याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याचा खून करण्यात आला. 2006 मध्ये मारणे टोळीच्याच सुधीर रसाळची देखील हत्या करण्यात आली. या दोन्ही खुनांचे आरोप होते संदीप मोहोळवर. संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा होता.
ADVERTISEMENT
मोहोळ अन् भाईगिरीचा मुळशी पॅटर्न…
संदीप मोहोळला पैलवानकीचा शौक होता. खूप लहान वयात संदीप गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळला होता. संदीप मोहोळचे वडील हे मार्केटयार्डमध्ये हमाली करायचे. घरची परिस्थिती ही बेताचीच होती.
ADVERTISEMENT
लहान वयापासून संदीप मोहोळला जमिनीमध्ये पैसा आहे ही गोष्ट नीट कळली होती. 19 व्या वर्षीच संदीप मोहोळने सुधीर रसाळची टोळी जॉईन केलेली आणि त्यानंतर काही गंभीर गुन्हांमध्ये संदीप मोहोळचे नाव पुढे येऊ लागलेले.
जमिनी रिकाम्या करणे, सातबारा क्लिअर करणं, जमिनीचे व्यवहार यातून संदीप मोहोळला मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागलेला. पैसा हातात येताच संदीप मोहोळला वेध लागले ते राजकारणाचे… संदीप मोहोळ त्याच्या मुठा गावचा सरपंच झाला. यापुढेही जाऊन संदीप मोहोळने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि माथाडी कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला. राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रांमध्ये संदीप मोहोळचा वावर होता.
दुसरीकडे मारणे टोळीचे दोन मेंबर मारल्यामुळे मारणे टोळी संदीप मोहोळच्या मागावर होती. दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा वाद होता. जमिनीचा वाद होता, मुळशी तालुक्यापासून कोथरुडपर्यंत सत्ता कोणाची यावरुन वाद होता. मारणे टोळीला अनिल मारणेच्या हत्येचा बदला घ्यायला होता. अनेक वेळा संदीप मोहोळला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले.. पण योगायोग म्हणा किंवा नशीब म्हणा तो निसटून जात होता. शेवटी एक फुल प्रुफ प्लान करण्यात आला.
संदीप मोहोळ मुठा गावातून कोथरुडकडे यायला निघाला तेव्हा मारणे टोळीकडून संदीप मोहोळचा पाठलाग सुरु झाला. संदीप मोहोळला याची चाहूल लागली होती. मुठा गावातून कोथरुडपर्यंत संदीप मोहोळ यांच्यावर तब्बल पाचवेळा हल्ला करण्यात आला आणि संदीप मोहोळने दाद दिली नाही. शेवटी संदीपची स्कॉर्पिओ ही कोथरुडमध्ये पोचली आणि तिथे पुन्हा त्याच्यावर हल्ला झाला. गाडीची काच हातोड्याने फोडण्यात आली आणि गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी 18 जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी संजय कानगुडे, समीर शेख, सचिन मारणे, गणेश मारणे, राहुल तारू, अनिल खिलारे, विजय कानगुडे, दीपक मोकाशी, शरद विटकर, नीलेश माझीरे, रहीम शेख, दत्तात्रय काळभोर यांची 2021 मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पांडुरंग मोहोळ, दिनेश आवजी, इंद्रनील मिश्रा यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला. तर सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबूब शेख, संतोष रामचंद्र लांडे या तिघांना जन्मठेप सुनावण्यात आली.
पण संदीप मोहोळच्या हत्येनंतर पुण्यातल्या टोळीयुध्दाचा भडका उडाला, गणेश मारणे हा अनिल मारणेच्या हत्येचा बदला घेऊन तुरुंगात गेला त्यामुले सूत्रं किशोर मारणेकडे आली.
बदला घेण्याची पाळी आता मोहोळ टोळीची होती. शरद मोहोळकडे संदीप मोहोळच्या टोळीची सूत्रं आली होती. किशोर मारणे हा पुण्यातल्या निलायम टॉकीज मध्ये सिनेमा बघायला गेला होता आणि याच टॉकीजबाहेर किशोर मारणेची कोयत्याने असंख्य वार करुन हत्या करण्यात आली.
हे ही वाचा>> Sharad Mohol : भावाची हत्या झाली त्याच ठिकाणी ठोकलं शरदला, पुण्यातील गँगवॉरचा इतिहास काय?
या केसमध्ये 33 साक्षीदार तपासण्यात आले आणि 7 आरोपींना जन्मठेप झाली 4 जण निर्दोष सुटले. शरद मोहोळ, हेमंत दाभेकर, दत्ता गोळे, योगेश गुरव, मुर्तझा शेख, अमित फाटक, दीपक भातम्बेकर अशी शिक्षा झालेल्यांची नावे होती. रोहन धर्माधिकारी, अजय कडू, नवनाथ फाले व संदीप नाटेकर या आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली.
शरद मोहोळ पिंटू मारणे हत्येप्रकरणाच्या खटल्यात जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले होते. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली. या कालावधीत येरवडा कारागृहात त्याने आणि विवेक भालेराव या दोघांनी मिळून दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला होता.
या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला होता. मात्र, बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरु केलं. खंडणीसाठी धमकावल्याबद्दल त्याच्यावर पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्यानंतर जुलै 2022 मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं. मधल्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आलेली आणि पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळ पत्नी स्वाती मोहोळच्या माध्यमातून राजकारणात उतरला होता. पण अखेर, शुक्रवारी 5 जानेवारीला शरद मोहोळचा देखील भर रस्त्यात अंत झाला. पुन्हा तोच सवाल आहे की, शरद मोहोळच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळीयुद्ध संपलंय की सुरु झालं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT