Lok sabha election 2024 : 'वंचित'शिवाय 'महाविकास आघाडी' करणार जागावाटपावर शिक्कामोर्तब?
Maha Vikas Aghadi Lok Sabha Seats Sharing : वंचित बहुजन आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आता महाविकास आघाडी जागावाटप करण्याच्या भूमिकत आहे. जागावाटप केल्यानंतर वंचितसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज

आधी जागावाटप करून वंचितसोबत चर्चेची शक्यता

महाविकास आघाडीत घडामोडींना वेग
Maha Vikas Aghadi Vanchit Bahujan Aghadi : "त्यांनी सूचवलेल्या जागांपैकी चार जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिला. मात्र, त्यानंतर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. ते आमच्यासोबत असते तर आम्हाला बळ मिळाले असते." शरद पवारांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानाने वंचित आणि मविआतील दुरावा समोर आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी वंचितसाठी चर्चेची दारं खुली ठेवून त्यानुषंगाने जागावाटप निश्चित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीचे जागावाटप वंचित बहुजन आघाडीमुळे रखडले आहे. पण, पहिल्या टप्प्यातील मतदान महिनाभरावर आलेले असून, आता महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीशिवाय पुढे जाण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
वंचितच्या भूमिकेने मविआ नाराज...
प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने वेगवेगळ्या मागण्या आणि भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीची अडचण झाली. त्यात चार जागांचा प्रस्तावही वंचित बहुजन आघाडीने फेटाळून लावला आहे. दुसरीकडे आंबेडकरांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बाजूला सारत काँग्रेसला वेगळा प्रस्ताव दिला. या भूमिकेमुळे मविआत नाराजी आहे. याबद्दल संजय राऊतांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
संजय राऊत काय म्हणाले?
"वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे सन्मानीय नेते आहेत. त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली. त्यांनी महाराष्ट्रात चार जागांवर लढावं, हा प्रस्ताव आम्ही दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता, तर निश्चितच आम्हाला आनंद झाला असता."