मुख्यमंत्र्यांकडून एवढा बालिशपणा…; आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर का संतापले?
आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रविवारी बैठक घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महापालिकेच्या प्रशासकांवरही टीका केली.
ADVERTISEMENT

Mumbai Rain Update Marathi News : पहिल्या पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असून, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावरून आदित्य ठाकरे यानी संताप व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेचे प्रशासकांवरही टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं. मुंबई महापालिकेवर हुकुमशाही सुरू असून, मोठे घोटाळे केले आहेत. रस्त्यांमध्ये घोटाळे केले आहेत. काल मुंबईत पाऊस पडला. मुंबईकरांनी फोटो ट्विट केलेत. जिथे कधीच पाणी तुंबलं नव्हतं तिथेही पाणी तुंबलं. शिवाजी महाराज पार्क असो वा इतर ठिकाणी.”
“काल रस्त्यावर मुंबई महापालिकेचे अधिकारी रस्त्यावर नव्हते. घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते, कुणालाच माहिती नाही. आज त्यांचं विधान पाहिलं की, ‘पाऊस आल्याचं स्वागत करा, मुंबईत पाणी तुंबलं यांची तक्रार काय करता?’ हे विधान म्हणजे निर्लज्जपणाचं. नाकर्तेपणाचा आणि भ्रष्टाचाराचा कुठला चेहरा असेल, तर ते खोके सरकार आहे. माझ्यासोबत माजी महापौर बसलेत. सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या वार्डात काम केलीत. पण, कधीही कुणी मुंबईकरांना असं उत्तर दिलं नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
एवढा निर्लज्जपणा बघितला नाही -आदित्य ठाकरे
“एवढा निर्लज्जपणा, एवढा उद्धटपणा, एवढा नाकर्तेपणा, एवढा भ्रष्टाचार मी आतापर्यंत कधीच मुंबईत बघितला नाही. मी गेल्या वर्षभरापासून दोन गोष्टींकडे लक्ष वेधतोय. एक रस्त्याचा घोटाळा आणि दुसरं म्हणजे नालेसफाई. या सरकारने वेगवेगळी आश्वासने दिली होती. एक सुद्धा गोष्ट झालेली नाही. दहीहंडीला खेळाचा दर्जा देणार होते, तेही यांच्याकडून झालेलं नाही”, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.










