लग्न का करुन देत नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या

वाशिम जिल्ह्यातील धक्कादायक घटना, आरोपी मुलगा अटकेत
लग्न का करुन देत नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या

माझं लग्न का करुन देत नाही असा प्रश्न विचारत मुलाने आपल्या वडीलांची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली आहे. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा प्रमोद धर्मा भारती याने शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजल्याच्या दरम्यान आपले वडील धर्मा भारती यांच्याशी, माझं लग्न का करुन देत नाही म्हणून वाद घातला. या दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या प्रमोदने कुऱ्हाडीने आपल्याच वडीलांच्या डोक्यात आणि पायावर वार करत त्यांना गंभीर जखमी केलं.

या घटनेनंतर नातेवाईकांनी जऊळका पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या धर्मा भारती यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं. यावेळी उपचारादरम्यान मध्यरात्री दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यानंतर मुलगा प्रमोदवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा प्रमोद हा व्यसनी होता. तो कोणताही कामधंदा करत नव्हता. याच कारणासाठी वडिल त्याचे लग्न लावून देत नव्हते, या कारणावरुन दोघांचे नेहमी वाद व्हायचे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in