
२१ जूनला शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपानंतर पुढे काय होणार ते स्पष्ट दिसत होतं. कारण एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३९ आमदार गेले होते तर अपक्ष १२ आमदार गेले. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आणि पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी ४ जुलैला विश्वासदर्शक ठरावही १६४ मतं मिळवत जिंकला. २१ जून ते ४ जुलै या कालावधीत सर्वाधिक चर्चा झाली ती एकनाथ शिंदे यांचीच.
फक्त राजकारणातच नाही तर सोशल मीडियावरही एकनाथ शिंदे यांचीच चर्चा होती. एका प्रसिद्ध व्यावसायिकाने एक फोटो ट्विट करत आपण सेम टू सेम एकनाथ शिंदे यांच्यासारखे कसे दिसतो हे दाखवून दिलं आहे. इतकंच नाही तर सॉरी आणि जय महाराष्ट्र असंही म्हटलं आहे.
उद्योजक हर्ष गोयंका हे त्यांच्या हटके ट्विट्ससाठी चर्चेत असतात ३ जुलैला म्हणजेच रविवारी हर्ष गोयंका यांनी ट्विट केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत दोन व्यक्ती आहेत एका बाजूला स्वतः हर्ष गोयंका तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. या फोटोत हे दोघे इतके सारखे दिसत आहेत की आपल्याला वाटू शकतं हे एकमेकांचे सख्खे जुळे भाऊ आहेत का? हा फोटो ट्विट करताना हर्ष गोयंकांनी लिहिलेली कॅप्शनही भन्नाट आहे.
काय आहे हर्ष गोयंका यांचं ट्विट?
"जे मला भेटायला येत आहेत त्यांना जो काही त्रास होतो आहे त्याबाबत मी दिलगीर आहे. मला माहित आहे की माझी झेड प्लस सुरक्षा मला भेटायला येणाऱ्यांसाठी काहीशी तापदायक ठरते आहे. तुम्ही सर्वजण मला समजून घ्याल आणि पाठिंबा द्याल ही अपेक्षा सॉरी आणि जय महाराष्ट्र." या आशयाची भन्नाट कॅप्शन देऊन हर्ष गोयंका यांनी हा फोटो ट्विट केला आहे. तसंच त्यापुढे त्यांनी एक स्मायलीही पोस्ट केला आहे.
हर्ष गोयंका यांनी हे भन्नाट ट्विट केल्यानंतर या फोटोवर लाइक्स, कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुमच्या चेहऱ्यात खूप साम्य आहे असं अनेक नेटकऱ्यांनी हर्ष गोयंका यांना उद्देशून म्हटलं आहे. तर काहींनी तुम्हा दोघांचं हसू वेगळं आहे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फार हसत नाहीत. अशाही कमेंट दिल्या आहेत. तर एकाने अत्यंत गंमतीत तुम्ही दोघे कधी कुंभमेळ्याला गेला होतात का? असा प्रश्न विचारला आहे. गोयंका यांचं हे ट्विट तसंच हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.