अपहरण करुन मामाला जंगलात फेकलं, भाच्याचं विचित्र कृत्य

Nephew kidnaps uncle: आपल्याच मामाचं अपहरण करुन त्याला जंगलात फेकून देणाऱ्या भाच्याला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. जाणून घ्या नेमकी काय घटना घडली?
अपहरण करुन मामाला जंगलात फेकलं, भाच्याचं विचित्र कृत्य
Nephew kidnaps uncle

मुंबई: आपल्याच मामाचं अपहरण करुन त्याला जंगलात फेकून देणाऱ्या भाच्यासह त्याच्या 5 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पैशाच्या व्यवहारामुळे भाच्याने आपल्या साथीदारांसह मामाचे हात-पाय बांधून त्याला जंगलात फेकून दिल्याची घटना घडली समोर आली आहे. ही घटना दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी आरोपी भाचा वनवेश्वर मंडल आणि इतर पाच मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भाच्याने त्याच्या मामाचं (जिनियल सबरा) दहिसर येथील कुबेर पॅलेस येथून अपहरण केलं होतं. सुरुवातीला त्याने आपल्या मामाला एका टेम्पोमध्ये टाकलं आणि नंतर त्याचे हात-पाय बांधले तसंच तोंडात कापडाचा बोळा देखील टाकला. जेणेकरुन त्याने आरडाओरड करु नये. यानंतर या सगळ्यांनी त्याला आनंद नगरमधील जंगल परिसरात टाकून दिलं आणि ते तिथून फरार झाले.

दरम्यान, जंगलात टाकून दिलेलं असताना देखील जिनियल सबरा हा न घाबरता रांगत-रांगत मुख्य रस्त्यापर्यंत आला. याचवेळी या भागातून जाणाऱ्या एका महिलेने त्याला त्या अवस्थेत पाहिलं आणि तिने तात्काळ याबाबतची माहिती पोलीस कंट्रोल रुमला दिली. पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित व्यक्तीची सुटका केली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं.

दुसरीकडे अपहरण केल्याप्रकरणी आरोपी वनवेश्वर याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन अवघ्या काही तासात त्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्या 5 मित्रांना देखील अटक करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

दहिसर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा जिनियल यांची सुटका करण्यात आली. सध्या त्यांना भगवती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अशीही माहिती दिली की, झाल्या प्रकाराने मामा जिनियल यांना खूप धक्का बसला असून ते बोलण्याच्या मनस्थितीत नाही. पैशांच्या वादातून हे अपहरण झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

भाचा वनवेश्वर याने आपल्या पाच मित्रांच्या साथीने सबरा यांचे अपहरण करुन त्यांना दोरीने बांधून जंगलात फेकलं होतं आणि त्यानंतर हे सगळे फरार झाले होते. अशावेळी भर जंगलातून रांगत-रांगत सबरा यांनी मुख्य रस्ता गाठला ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामा सबरा आणि भाचा वनवेश्वर हे मूळचे ओरिसाचे आहेत आणि सध्या ते मुंबईत एका इमारतीचं बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी काम करत होते. पण अलीकडे पैशांच्या वादातून दोघांमध्ये अनेकदा भांडणं होऊ लागलेली. याच वादातून वनवेश्वर याने हे विचित्र कृत्य केलं.

Nephew kidnaps uncle
मुंबईत Blessing Money च्या वादातून तृतीयपंथीयाकडून तीन महिन्यांच्या मुलीचं अपहरण आणि हत्या

आरोपी वनवेश्वर असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

जेव्हा मामा सबराची पोलिसांनी सुटका केली तेव्हा तो काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. पोलिसांना त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली ज्यामध्ये एक मोबाइल नंबर होता. याच नंबर जेव्हा पोलिसांनी फोन केला तेव्हा समोरच्या व्यक्तीने पोलिसांना सांगतिले की, सबरा याला अटक करा. फोनवरील व्यक्तीने पोलिसांना असं सांगण्यामागचं कारण म्हणजे ती व्यक्ती खुद्द वनवेश्वर मंडल होती.

जेव्हा पोलिसांनी वनवेश्वरला पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितलं तेव्हा त्याने काही न बोलता फोन बंद केला. एवढंच नव्हे तर त्याने त्यानंतर आपला फोन स्वीच ऑफ करुन टाकला. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. त्यामुळे त्यांनी वनवेश्वरचं मोबाइल लोकेशन तपासून त्याला मालाडमधून अटक केली. तर त्याच्या इतर पाच साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.