आता हसन मुश्रीफांचे जावई किरीट सोमय्यांच्या रडारवर, केला हा गंभीर आरोप

जाणून घ्या काय म्हटलं आहे किरीट सोमय्यांनी
आता हसन मुश्रीफांचे जावई किरीट सोमय्यांच्या रडारवर, केला हा गंभीर आरोप

ठाकरे सरकारने अखेर घोटाळेबाजांचे सरकार आहे हे मान्य केलं. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयाच्या कंपनीला भ्रष्ट पद्धतीने जयोस्तुते प्रा. लिमिटेडला ग्रामपंचायतींचे TDS Return फाईल करण्याचं कंत्राट दिलं. या कंपनीला सुरू होऊन चार महिनेही झाले नव्हते तरीही हसन मुश्रीफ यांनी पदाचा गैरवापर करून हे कंत्राट दिलं होतं असा आरोप किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला.

आणखी काय म्हणाले किरीट सोमय्या?

मी याविरोधात कोल्हापूरला आंदोलन केलं होतं. त्यावेळी मला कोल्हापूरला जाण्यापासून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी रोखलं होतं. मात्र आता ते भ्रष्ट कंत्राट ठाकरे सरकारने रद्द केलं आहे. हसन मुश्रीफ यांच्या जावयाला 10 मार्च 2021 ला हे कंत्राट देण्यात आलं होतं. महाराष्ट्रातल्या 27 हजार ग्रामपंचायतींचं कंत्राट या कंपनीला देण्यात आलं होतं. एका ग्रामपंचायतीकडून वर्षाला 50 हजार रूपये जयोस्तुते लिमिटेडला पुढील दहा वर्षांसाठी द्यायचे असं या कंत्राटात होतं. म्हणजेच 15 हजार कोटींचा हा घोटाळा आहे हे उघड आहे असंही किरीट सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरे सरकारने जयोस्तुतेला हे कंत्राट देऊन महाराष्ट्रातल्या नऊ कोटी ग्रामीण जनतेवर अन्याय केला होता असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2021 ला सरकारने एक जीआर काढला. जयोस्तुते प्रा. लिमिटेडसोबत महाराष्ट्र शासनाने केलेला करारनामा रद्द करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. हसन मुश्रीफ असो किंवा उद्धव ठाकरे कोव्हिडच्या काळातही किती मोठा भ्रष्टाचार केला होता हे आपल्याला यावरून लक्षात येतं असंही किरीट सोमय्या म्हणाले.

30 मार्च 2021 ला करार झाला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये होता. त्या लॉकडाऊनमध्ये मिया मुश्रीफ काय काम करत होते? तर कोव्हिडच्या नावाने महाराष्ट्राच्या जनतेला लुटत होते असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला. या कंत्राटाची प्रक्रिया 5 मे 2020 ला सुरू झाली होती. त्यावेळीही महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये होता. उद्धव ठाकरे घराबाहेर नाही तर खोलीच्या बाहेरही पडत नव्हते. त्यावेळी शरद पवारांचे पट्टशिष्य असलेल्या हसन मुश्रीफ यांनी 15 हजार कोटी लुटण्याचा डाव आखला असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in