अनिल देशमुखांवर आरोप, गृहमंत्रीपदाचा राजीनामा; अटक ते ईडी कोठडी! वाचा आत्तापर्यंत काय काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्याचवेळी त्यांना अटक होईल का? अशा शक्यता वर्तवल्या जात होत्याच. त्या खऱ्या ठरल्या, अनिल देशमुख यांना रात्री उशिरा अटक झाली. आज त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली आहे. अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यांना ते पद सोडावं तर लागलंच शिवाय त्यांना आता तुरुंगातही जावं लागलं आहे. अटक होण्याची नामुष्कीही त्यांच्यावर ओढवली. काय काय घडलं आत्तापर्यंत जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

अधिवेशन गाजवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची गोष्ट!

अर्थ संकल्पीय अधिवेशनात आरोप

हे वाचलं का?

1 मार्च ते 8 मार्च या कालावधीत महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. हे अधिवेशन वादळी ठरलं ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे. पुराव्यांसहीत दाखवलेल्या तथ्यांमुळे. कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचारावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढले. यवतमाळमध्ये लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी आणि भंडारा रुग्णालयात आग लागून झालेल्या बाळांच्या मृत्यूंचीही उदाहरणं दिली.

या सगळ्यात अनिल देशमुखांसाठी कठीण दिवस ठरला तो 5 मार्च. अँटेलिया प्रकरणावरून त्यांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली. सरकार सचिन वाझेला अभय का देतं आहे? हे विचारण्यासही त्यांनी सुरूवात केली. एवढंच नाही तर जी स्कॉर्पिओ अंबानी यांच्या घरासमोर आढळली होती. ती मनसुख हिरेन यांच्या मालकीची आहे हे त्यांनी सभागृहाला सांगितलं. अनिल देशमुख या आरोपांवर बोलायला उभे राहिले. स्कॉर्पिओ हिरेन यांच्या मालकीची नाही तर त्यांच्या मित्राची होती, मनसुख हिरेन यांचे हात बांधलेले नव्हते असं म्हणत देशमुख यांनी फडणवीसांचे मुद्दे खोडून काढले खरे. पण फडणवीसांनी पुन्हा उभं राहून गृहमंत्र्यांच्या निवेदनाला आक्षेप घेतला. हिरेन यांचा कबुली जबाब वाचून दाखवला तसंच हिरेन यांनी ही गाडी विकत घेतल्याचं कबुली जबाबात म्हटल्याचंही स्पष्ट केलं. पोलीस तुम्हाला माहिती देत नाहीत का? पोलीस तुम्हाला चुकीचं ब्रिफिंग करतात का? असे प्रश्न विचारत फडणवीस यांनी देशमुखांना निरूत्तर केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसात म्हणजेच साधारण 15 मार्चच्या सुमारास मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. त्यानंतर जे झालं ते तर सगळ्यांनाच माहित आहे. 20 मार्चला परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. पत्र कसलं हा तर लेटरबॉम्बच होता. कारण अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून 100 कोटी रूपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप त्यांनी या पत्रातून केला. त्यानंतर पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या यामध्ये अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणून हस्तक्षेप केल्याचंही त्यांनी या पत्रात नमूद केलं.

अनिल देशमुख हे गप्प बसले नाहीत त्यांनी कोर्टात धाव घेतली. ज्यानंतर परमबीर सिंग यांनीही कोर्टात धाव घेतली. त्यात काळात शरद पवार यांनी सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांवरचे आरोप कसे चुकीचे आहेत हे सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र शांतच राहिले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले त्यानुसार परमबीर सिंग हे आपलं म्हणणं घेऊन बॉम्बे हायकोर्टात गेले. बॉम्बे हायकोर्टात एप्रिल महिन्याच्या पाच तारखेला हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी देण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. कोर्टाने माझ्यावर जे आरोप झालेत त्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशावेळी गृहमंत्रीपदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही म्हणून मी स्वतःहून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे असं त्यांनी राजीमामा पत्रात लिहिलं होतं. त्यांचा राजीनामा मंजूर झाला त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याचं गृहमंत्रीपद गेलं.

Anil Deshmukh: ‘मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरुन चालणारा माणूस..’, पाहा अनिल देशमुख काय म्हणाले

14 एप्रिलला सीबीआय चौकशीसाठी अनिल देशमुख हजर

14 एप्रिलला सीबीआय चौकशीसाठी अनिल देशमुख हजर राहिले. त्यांची सीबीआयने साडेसहा तास चौकशी केली. सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर, कार्यालयांवर आणि मुंबईतील ज्ञानेश्वरी या बंगल्यावर छापे मारले. काही महत्त्वाची कागदपत्रंही सीबीआयने ताब्यात घेतली. तर ज्ञानेश्वरी बंगल्यावरचं सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं. सीबीआयने जे प्रश्न विचारले त्याची मी उत्तरं दिली आहेत आता नागपुरात कोव्हिड वाढतो आहे त्यामुळे मी कोव्हिड सेंटरला भेट देण्यासाठी चाललो आहे असं अनिल देशमुख यांनी चौकशीनंतर माध्यमांना सांगितलं.

त्यानंतर 24 एप्रिललाही त्यांची सीबीआयकडून सुमारे साडेदहा तास चौकशी कऱण्यात आली.

अनिल देशमुख यांच्यासाठी कोट्यवधींची वसुली करत होता सचिन वाझे, ED चा दावा

अनिल देशमुख हायकोर्टात

परमबीर सिंग यांनी जे आरोप केले त्याविरोधात अनिल देशमुख यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. मे महिन्यात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद आहे असं वक्तव्य त्यावेळी त्यांनी केलं होतं.

11 मे 2021 ला ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतरही मी न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा मला दिली जाते आहे. सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं. असं म्हणत एक व्हीडिओ मेसेजही 11 मे रोजी अनिल देशमुख यांनी ट्विट केला होता आणि ईडीला सहकार्य करणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं.

अनिल देशमुख यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडी, आयटी आणि सीबीआयचे छापे सुरूच होते. अशात जून महिन्यात त्यांना एक दणका मिळाला. 26 जून 2021 ला ईडीने कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या दोघांनाही अटक केली. अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत अशी चर्चा तेव्हा झाली. मात्र परमबीर सिंग यांनी व्यक्तीगत आकसातून माझ्यावर आरोप केले आहेत असं त्यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.

30 जूनला ED ने कोर्टात काय दावा केला?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. आता तो हिशोब ईडीने समोर आणल्याचा दावा केला आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझेने डिसेंबरपासूनच अनिल देशमुखांसाठी वसुली सुरू केली होती. एवढंच नाही आता ईडीकडून अशाही पोलिसांची चौकशी होते आहे ज्यांच्यावर वसुलीचा आरोप झाला होता. हे सगळेजण अनिल देशमुखांसाठी वसुली करत होते का? याचाही तपास केला जात असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

20 मार्चला परमबीर सिंग यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्रात दर महिन्याला बार आणि रेस्तराँच्या मालकांकडून 100 कोटी रूपये वसूल करण्यात यावेत असं अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सांगितलं होतं. ईडीने आता या संपूर्ण प्रकरणी अशा पोलिसांचीही चौकशी सुरू केली आहे ज्यांच्यावर वसुलीचे आरोप लागले आहेत.ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान सचिन वाझेने अनिल देशमुखांसाठी 4 कोटी 70 लाख रूपये वसूल केले होते.

14 जुलैला अनिल देशमुख यांच्या पत्नीला समन्स

मनी लाँडरिंग प्रकरणात 14 जुलैला ईडीने अनिल देशमुख यांच्या पत्नीला समन्स बजावलं. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश गुमरे यांनी याबाबतची माहिती दिली

जुलै महिन्यात यानंतर या प्रकरणात फारशा काही घडामोडी घडल्या नाहीत. मात्र अनिल देशमुख हेदेखील समोर आलेले नव्हते. तसंच परमबीर सिंगही कुठे आहेत? हे स्पष्ट झालं नाही. त्यांच्या विरोधातही काही तक्रारी नोंदवल्या गेल्या. सप्टेंबर महिन्यात अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांचं निलंबन कऱण्यात आलं. तर 17 सप्टेंबरला आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापा मारला होता.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा

11 ऑक्टोबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. सीबीआयच्या सूत्रांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न असलेल्या एका संस्थेत आर्थिक अफरातफऱ झाल्याचं कळतं आहे. या दरम्यान 17 कोटींचं उत्पन्न लपवण्यात आलं आहे असंही समजतं आहे. 17 सप्टेंबरला याच कारणामुळे आयकर विभागानेही छापा मारला होता.

1 नोव्हेंबरला अनिल देशमुख हे थेट ईडी कार्यालयात हजर झाले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेकदा समन्स बजावले होते. मात्र, असं असूनही ते मागील अनेक महिन्यांपासून या यंत्रणांसमोर हजर होत नव्हते. मात्र सोमवारी (1 नोव्हेंबर) दुपारी बारा वाजेच्या सुमारास अनिल देशमुख हे अचानक मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीकडून अनिल देशमुख यांना चौकशीसाठी वारंवार समन्स बजावण्यात आलेलं होतं. पण देशमुख ईडीसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अशीही चर्चा सुरु होती की, अनिल देशमुख हे देश सोडून पळून तर गेलेले नाही ना?

1 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. तर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT