राज्यसभा निवडणुकीत प्रचंड मोठा ‘Twist’, भाजपच्या ‘त्या’ पत्रामुळे मतमोजणीच थांबली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपकडून आता सर्व आयुधांचा वापर होत असल्याचं दिसतं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत असल्याने भाजपने एक वेगळी रणनिती आखली आहे. ज्यामुळे या संपूर्ण निवडणुकीत एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद करण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रारीचं एक पत्रच दिलं आहे. ज्यामुळे महाराष्ट्र विधानसभेतील मतमोजणी थांबविण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने असा दावा केला आहे की, मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांनी मतदानाची प्रक्रिया पाळली नाही. त्यांनी त्याचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे ही तीन मतं बाद व्हावीत अशा आशयाचं पत्र भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलं आहे.

भाजपने महाराष्ट्रातील मतमोजणी संदर्भात निवडणूक आयोगाकडे जाऊन आपली तक्रार नोंदवली आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसने 2017 मध्ये निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती त्याच पद्धतीने आता भाजपने दिल्लीत निवडणूक आयोगासमोर आपली तक्रार नोंदवली आहे.

हे वाचलं का?

एक शिष्टमंडळ ज्यामध्ये मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनसिंह मेघवाल, ओम पाठक आणि जितेंद्र सिंह यांच्या सहीने तक्रार पत्र आयोगाकडे देण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

या पत्रात असं म्हटलं आहे की, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांची मतं रद्द करावीत या संदर्भात पत्र देऊन भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे.

ADVERTISEMENT

पत्रात म्हटलं आहे की, तिकडच्या रिटर्निंग ऑफिसरकडे तक्रार केलेली असताना देखील त्या ऑफिसरने याबाबत काहीही मत व्यक्त केलं नाही. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ही तक्रार दाखल केली आहे.

‘या’ घटनेचा दाखला देत भाजपने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

2017 साली गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला समर्थन करणाऱ्या एका अपक्ष आमदाराने भाजपच्या प्रतोदाला मतदान दाखवलं होतं. त्यामुळे ते मतदान बाद ठरविण्यात आलं होतं.

त्यामुळे यावर आक्षेप घेत हे संपूर्ण प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं होतं. तेव्हा आयोगाने स्पष्टपणे निर्णय दिला होता की, त्यांनी आपल्या पक्षाच्या नसलेल्या प्रतोदांना म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीला मत दाखवलं होतं. त्यामुळे हे मत बाद ठरविण्यात यावं. असा निर्णय तेव्हा देण्यात आला होता.

आता याच गोष्टीचा दाखला यावेळी भाजपने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात जर निवडणूक आयोगाने भाजपविरोधात निर्णय दिला तर भाजप सुप्रीम कोर्टाचे दरवाजे देखील ठोठावू शकतं. त्या दृष्टीने भाजपने तयारी देखील केली असल्याचं सध्या समजतं आहे.

‘आजारी आमदारांना मतदानाला आणलं यावरुन लक्षात घ्या भाजप किती टेन्शनमध्ये आहे’, रोहित पवारांचा टोला

निवडणूक आयोगाने भाजपचा दावा ग्राह्य धरला तर काय होईल?

आजच्या (10 जून) निवडणुकीत विधानसभेच्या 285 आमदारांनी मतदान केलं आहे. जर ही तीन मतं बाद ठरली तर हा आकडा 282 वर येईल. कमी झालेली ही सगळी मतं महाविकास आघाडीची आहेत. त्यामुळे त्याचा फटका हा महाविकास आघाडीलाच बसणार आहे.

अशावेळी जर निवडणूक आयोगाने गुजरातचा दाखला देत भाजपचा दावा ग्राह्य धरला तर या निवडणुकीत फार मोठी उलथापालथ होऊ शकते. निवडणूक आयोगाने भाजपचा दावा विचारात घेतला नाही तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल.

गुजरातमध्ये दोन काँग्रेस आमदारांनी काँग्रेसच्या प्रतोदाला मत न दाखवता भाजपच्या प्रतोदाला मत दाखवलं होतं. ज्याला काँग्रेसने आक्षेप घेतला होता. तो आक्षेप निवडणूक आयोगाने देखील मान्य केला होता. त्यामुळे ती दोन मतं निवडणूक प्रक्रियेतून बाद ठरविण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अहमद पटेल हे राज्यसभेची निवडणूक जिंकले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT