महाराष्ट्र ते गुजरात Tauktae चक्रीवादळाचा कहर, पाहा या चक्रीवादळातील 15 महत्त्वाच्या घटना
मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) जवळजवळ सर्वच किनारपट्टी भागाला आपला तडाखा दिला आहे. त्यानंतर आज (18 मे) पहाटे हे चक्रीवादळ गुजरातमध्ये (Gujurat) धडकलं. जेव्हा हे वादळ तिथं धडकलं तेव्हा त्याचा वेग हा तब्बल ताशी 140 ते 150 किमी एवढा होता. या वादळामुळे बर्याच ठिकाणी अक्षरश: विनाश ओढावला आहे. या वादळामुळे […]
ADVERTISEMENT
मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) जवळजवळ सर्वच किनारपट्टी भागाला आपला तडाखा दिला आहे. त्यानंतर आज (18 मे) पहाटे हे चक्रीवादळ गुजरातमध्ये (Gujurat) धडकलं. जेव्हा हे वादळ तिथं धडकलं तेव्हा त्याचा वेग हा तब्बल ताशी 140 ते 150 किमी एवढा होता. या वादळामुळे बर्याच ठिकाणी अक्षरश: विनाश ओढावला आहे.
ADVERTISEMENT
या वादळामुळे कमीत कमी हानी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. ज्यामुळे काही प्रमाणात नुकसान नियंत्रित होऊ शकलं असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हे वादळ आजवरचं सर्वात भयंकर वादळापैकी एक होतं. असं म्हटलं जात आहे. या वादळाने महाराष्ट्र ते गुजरातपर्यंत कसा धुमाकूळ घातला हे आता आपण 15 महत्त्वाच्या मुद्द्यांमधून जाणून घेऊयात.
1. सोमवारी रात्री उशिरा तौकताई हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात पोहोचलं. इथे वाऱ्याचा वेग हा तब्बल ताशी 185 किमी प्रति तास असल्याची नोंद करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
2. अरबी समुद्रातून वाटचाल करणाऱ्या या वादळामुळे मुंबईच्या समुद्रात अक्षरश: तांडव पाहायला मिळालं, यावेळी खोल समुद्रात 410 जण अडकले ज्यामधील काही जणांना वाचविण्यात नौदलाला यश आलं असलं तरीही अद्याप काही जणांचा शोध सुरू आहे.
3. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. मुंबईत सुरुवातीला ताशी 70 ते 80 किमी एवढा वेग होता. मात्र त्यानंतर वाऱ्याचा वेग हा जवळजवळ 100 पर्यंत जाऊन पोहचला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
4. मुंबईच्या कुलाबा भागात सर्वात वेगाने वारे वाहत होते, इथे तब्बल ताशी 108 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. यामुळे या भागात अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत.
5. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईतील बर्याच भागात झाडे कोसळली, त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक खोळंबली होती. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची अनेक पथकं रस्त्यावर सातत्याने कार्यरत होते.
6. मुंबईच्या खार भागात वादळामुळे अनेक मोठमोठे होर्डिंग पडल्याचं देखील पाहायला मिळालं, तसेच बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं होतं. काही ठिकाणी सबवेमध्ये पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
चक्रीवादळादरम्यान मुंबईच्या समुद्रात अडकले 410 जण, खोल समुद्रात नौदलाच्या जवानांनी लावली प्राणांची बाजी
7. तौकताई या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईच्या लोकल ट्रेनवर देखील झाला. विक्रोळी-घाटकोपर या स्थानकदरम्यान एका लोकल ट्रेनवर झाड कोसळल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, लोकल सेवा आधीच बंद करण्यात आली होती.
8. तुफान चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळ आणि मोनोरेल देखील बंद करण्यात आले होते.
9. वादळामुळे मुंबईचा वांद्रे-वरळी सी लिंक हा अद्यापही प्रवासासाठी बंद आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सी लिंक हा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने आधीच घेतला होता.
10. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात वादळाची तीव्रता लक्षात घेऊन NDRF च्या अनेक तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.
11. तौकताई चक्रीवादळामुळे कोरोनाच्या 600 रुग्णांना आधीच सुरक्षितपणे महापालिकांच्या इतर रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. हे सर्व रुग्ण किनारी भागातील जवळच्या रुग्णालयात होते.
12. या चक्रीवादळावर केंद्र सरकार देखील सातत्याने लक्ष ठेवून आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा देखील केली होती. दरम्यान, हे वादळ संपल्यानंतरही राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
13. मुंबईप्रमाणेच गुजरातला देखील या चक्रीवादळाचा बराच फटका बसला आहे. त्यामुळे येथील कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना देखील दुसऱ्या जागी हलविण्यात आलं होतं.
14. गुजरातमधील सोमनाथ येथे लष्कराकडून बचाव मोहीम सुरु करण्यात आली आहे. सोमनाथ ते दीवपर्यंतचा रस्ता हा वादळामुळे बंद झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
15. तौकताई चक्रीवादळाचा लँडिंग पॉईंट हा दीवमध्ये असल्याने इथे अक्षरश: विनाशाची परिस्थिती ओढावली आहे. येथे जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून किनारपट्टी भागात मोठं नुकसान झालं आहे.
चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार पाऊस, विमानतळ बंद
महत्त्वाचे म्हणजे हवामान खात्याने यापूर्वीच तौकताई वादळाविषयी इशारा दिला होता. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून बरीच पूर्वतयारी करण्यात आली होती. किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं. तसेच अनके ठिकाणी NDRF आणि इतर मदत पथके तैनात करण्यात आली होती. ज्यामुळे वादळाचा सामना करणे सोपे झाले आणि कमीत कमी हानी झाली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT