Pune Crime : गुन्हे करुन त्याचा उपयोग करायचा कथा लेखनासाठी; लेखकाला सायबर पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आतापर्यंत अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपट तुम्ही गुन्हेगारी जगतातील सत्य घटनेवर आधारीत पाहिले असतील. परंतू पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हायप्रोफाईल महिलांशी तुमचं नातं जोडून देतो असं सांगून बड्या लोकांना फसवल्याबद्दल अनुप मनोरे या लेखकाला पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अनुप आपण गेलेल्या गुन्ह्यावर कथा लिहीत असल्याचं समोर आलंय.

ADVERTISEMENT

आरोपी अनेक भाषांमध्ये लिखाण करणारा एक लेखक –

आरोपी अनुप हा मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिखाण करणारा एक लेखक आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बड्या कलाकारांसोबत त्याची उठबस होती. हिंदी रंगभूमीवर त्यानं शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर आधारित रंग रसिया बालम या नाटकात काम केलं आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी शरीर संबंध प्रस्थापित करून देतो, असे सांगत हजारो लोकांना फसवत आला आहे. या कामासाठी अनुपने गणेश शेलार या खोट्या नावाचा वापर केला होता.

हे वाचलं का?

…आणि अनेक महिला त्याच्या कथेतलं पात्र बनत गेल्या –

ADVERTISEMENT

गुन्हा करण्यासाठी अनुपने वापरलेली पद्धतही एखाद्या सस्पेन्स थ्रिलरला लाजवेल अशी आहे. अनुप वृत्तपत्रांमध्ये महिलांसाठी नोकरीची संधी अशा शीर्षकाखाली जाहिरात द्यायचा. ती जाहिरात बघून ज्या महिला त्याच्याशी संपर्क करायच्या त्या महिलांकडून तो त्यांची कागदपत्रं मागवून घ्यायचा. या कागदपत्रांच्या आधारावर नंतर तो बँकेत अकाऊंट ओपन करायचा. प्रत्येक अकाऊंटच्या बदल्यात त्या महिलांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये मिळायचे आणि बाकीचे पैसे अनुप स्वतः वापरायचा. याच अकाऊंटच्या जोरावर अनुपने अनेक बड्या हस्तींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. आपण पाठवत असलेले पैसे एका महिलेच्या खात्यात जातायत त्यामुळे अनेकदा या बड्या हस्तींनाही अनुपचा संशय आला नाही. अशा पद्धतीने मागील दहा वर्षात कळत-नकळतपणे अनेक महिला आणि पुरुष अशाप्रकारे त्याच्या या कथेतील पात्र बनत गेल्या.

ADVERTISEMENT

फसवणुकीच्या या गुन्ह्यात महिलाही सहभागी –

अनुप मनोरेच्या या फसवणुकीच्या गुन्ह्यात अनेक महिलाही पुढे सहभागी होत गेल्या. त्यापैकी दिपाली शिंदे नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून आणखी दोन महिलांचा शोध पोलीस घेत आहेत. पुण्यातील एका ७६ वर्षांच्या व्यवसायिकाने दीपाली शिंदेने आपल्याला हाय प्रोफाइल महिलांशी संबंध निर्माण करून देतो असं सांगत वेगवगेळ्या बँक अकाउंटमध्ये साठ लाख रुपये जमा करायला लावल्याची तक्रार सायबर पोलिसांना दिली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पोलीस दीपाली शिंदेपर्यंत पोहचले. परंतू या रॅकेटचा मास्टरमाइंड आपण नसून गणेश शेलार असल्याचं दिपालीने पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलीस या गणेश शेलार पर्यंत पोहचले तेव्हा गणेश शेलार हाच अनुप मनोरे असल्याचं पुढं उघड झालं आणि त्याचं बिंग फुटलं.

मागील दहा वर्षांच्या काळात अनुपने अशा पद्धतीने अनेकांना आपल्या मायाजालात ओढत फसवल्याचं कळतंय. पुणे पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली असून आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून मुख्य आरोपी पोलीस कस्टडीत आहे. अनुप मनोरेच्या अटकेमुळे एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असला तरीही त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली पद्धत पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT