‘मला पुष्पगुच्छ नकोय’; उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना वाढदिवसानिमित्त कोणतं गिफ्ट मागितलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज काळाचौकी इथं शिवसेनेच्या शाखेचे उद्धाटन पार पडले आहे. शाखेचे उद्धाटन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले. यामध्ये त्यांनी बंडखोरांपासून भाजपपर्यंत सर्वांवर टीका केली आहे. उद्या उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यासाठी त्यांनी शिवसैनिकांकडून वेगळं गिफ्ट मागितलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले ”बंडखोरांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे शिवसेना आमचीच आहे. मग माझ्यासमोर जे आहेत ते कोण आहेत. त्यासाठी आपल्याला दोन प्रमुख कामं करायची आहेत. एक म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र माझ्यासकट माझ्या गटप्रमुखाचं शपथपत्र मला हवंय. आणि दुसरं काम म्हणजे सदस्यनोंदी. मला वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको तर सदस्यनोंदणी आणि शपथपत्रांचे गठ्ठे हवे आहेत.”

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले ”भाजपला शिवसेना पक्ष संपवायचा आहेच पण त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नातं संपवायचं आहे. परंतु त्यांच्या कितीही पिढ्या आल्यातरी शिवसेना संपवू शकत नाहीत. तुमच्यात जर एवढीच हिम्मत असेल तर माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, त्यांच्यानावावर मतं मागू नका तुम्ही तुमच्या आईवडिलांचे फोटो लावून मोठे व्हा”.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सध्या आमदार-खासदारांचं सगळं ऐकावं लागतं, कारण…

”गेले बरेच दिवस शाखेच्या उद्धाटनासाठी अरविंद सावंत माझ्या मागे लागले होते पण मी दुर्लक्ष करत होतो, पण हल्ली दिवस असे आहेत की आमदार खासदार जे म्हणतील ते ऐकावं लागतं. सध्या कोण कोणाचं आहे हे माहित नाही. मला माहितीये कितीही वादळं येतील, पाळापाचोळा झडून जाईल परंतु शिवसेनेची मुळं घट्ट आहेत ती घट्ट राहतील. जे गेलेत त्यांचं कोणत्या भाषेत वर्णन करायचं? बंडखोरांनी स्वत: च्या हातानी कपाळावर गद्दारीचा शिक्का मारुन घेतला आहे. त्यामुळे त्यांना गद्दार म्हटलं जात आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

”त्यांच्यासोबत एकही सच्चा शिवसैनिक नाही”

”जे गेलेले आहेत त्यांच्यासोबत एकही सच्चा शिवसैनिक गेलेला नाही. त्यांना वाटलं होतं जिथे सत्ता असते तिथे शिवसैनिक येत असतो पण जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येत असते. जे गेलेत ते अशा गर्दीत शिवसैनिकांमध्ये मिसळून दाखवू शकतील का? पोलीस बंदोबस्त राहावं लागत आहे, कोणापासून ज्यांनी तुम्हाला निवडणून दिलं त्यांच्यापासून?. लोकप्रतिनिधी हा लोकांमध्ये फिरणारा असावा लागतो असे ही उद्दव ठाकरे यावेळी म्हणाले, आणि लवकरच ते महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT