कल्याण-डोंबिवलीमधील Zomato रायडर्सचे काम बंद आंदोलन, नेमकं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उल्हासनगर: खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर मधील रायडर्सनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये शेकडो रायडर सहभागी झाले असून कंपनीकडून मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यत आंदोलन सुरु राहणार असल्याचे या रायडर्सनी सांगितले आहे.

गेल्या 2 वर्षांत आणि त्यातही विशेषतः लॉकडाऊनच्या काळात घरात अडकून पडलेल्या लोकांना या झोमॅटो रायडर्सनी मोठा आधार दिला. आपल्या आवडीच्या आणि हव्या त्या खाद्यपदार्थांची थेट घरपोच डिलिव्हरी मिळत असल्याने लॉकडाऊन काळात अनेक ग्राहकांनी या पर्यायाला पसंती दिल्याचे दिसून आले. मात्र गेल्या 2 दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगरमधील अनेक झोमॅटो रायडर्सनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

सध्या पेट्रोलच्या दराने आकाशाला गवसणी घातली असून त्याचा सर्वाधिक फटका या रायडर्सच्या उत्पन्नावर बसला आहे. प्रत्येक ऑर्डरच्या डिलिव्हरीसाठी कंपनीकडून देण्यात येणारे कमिशन आणि ती ऑर्डर पोचवण्यासाठी येणारा खर्च यामध्ये मोठी तफावत आली आहे. त्याचा परिणाम कंपनीकडून मिळणाऱ्या आमच्या कमिशनवर झाला असून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात आम्ही घर कसे चालवायचे असा सवाल या रायडर्सनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कंपनीकडून देण्यात येणारी आठवड्याची सुविधा सुरू ठेवावी, रात्रीच्या वेळी दूरच्या ऑर्डर देताना कंपनीने नियोजन करावे. दूर अंतराच्या ऑर्डर कमी करावे. शहरांतर्गत ऑर्डर स्थानिक रायडरलाच मिळाव्यात. टीम लीडरकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. कंपनीकडून मिळणारे मिनिमम गॅरंटी पे पुन्हा सुरू करावे यांसारख्या विविध मागण्यांसाठी या रायडर्सनी आंदोलन सुरू केले आहे.

अशा प्रकारे आंदोलन करणे आम्हालाही करायची इच्छा नसून कंपनीने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करण्याची कळकळीची विनंतीही या रायडर्सनी केली आहे.

ADVERTISEMENT

झोमॅटोच्या ‘त्या’ डिलीव्हरी बॉयबाबत परिणीती चोप्रा म्हणते…

ADVERTISEMENT

दरम्यान, कंपनीच्या प्रतिनिधींनी काल संध्याकाळी या झोमॅटो रायडर्सची भेट घेत त्यांच्या मागण्या लिहून घेतल्या आहेत. त्या मागण्या आता वरिष्ठांपर्यंत पोहचवण्यात येणार असून त्यानंतरच त्यावर निर्णय होणार आहे.

मात्र, या सगळ्याचा कल्याण-डोंबिवलीमधील झोमॅटो कंपनीवर ताण पडत आहे. एकाच वेळी शेकडो रायडर नसल्याने ग्राहकांच्या ऑर्डर घेणं कंपनीला मुश्कील होत आहे. त्यामुळे याबाबत कंपनीकडून लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. जेणेकरुन हे सगळं सुरुळीत होऊन येथील झोमॅटो ग्राहकांना त्यांची ऑर्डर वेळेत मिळू शकेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT