विमानातील प्रवाशासाठी भागवत कराड ठरले देवदूत; मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

Union minister Bhagwat Karad Indigo Flight: केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांचं पंतप्रधानांनी ट्वीट करत केलं कौतुक...
विमानातील प्रवाशासाठी भागवत कराड ठरले देवदूत; मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड केलेल्या एका मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीही भारावून गेले. डॉ. कराड विमानातून प्रवास करत असताना एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला सारत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्या या मदतीचं पंतप्रधान मोदींनीही ट्वीटवरून कौतुक केलं.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे इंडिगोच्या विमानातून दिल्लीवरून मुंबईला येत होते. विमान हवेत झेपावल्यानंतर तासाभराने विमानातील एका प्रवाशाची अचानक तब्येत बिघडली. त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने उद्घोषणा करत विमानात कुणी डॉक्टर आहे का? अशी विचारणा केली.

ही घोषणा ऐकून केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी तातडीने तब्येत बिघडलेल्या प्रवाशांच्या दिशेनं धाव घेतली. भागवत कराड सर्जन असून, त्यांनी तातडीने रुग्णावर प्राथमिक उपचार केले आणि विमानातील आपतकाळीन किटमधील औषधीही दिली. त्यामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.

ही सर्व घटना मुंबईच्या दिशेनं येत असताना घडली. इंडिगोनं आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्वीट करत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड यांचे आभार मानले.

'केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड यांचे आम्ही आभारी आहोत. ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवली नाही. डॉ. कराडजी आपण एका सहप्रवाशाला मदत करणं, ही गोष्ट प्रेरणादायी आहे', असं इंडिगोनं म्हटलं होतं. इंडिगोचं ट्वीट सगळीकडे व्हायरल झालं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनीही कराड यांचं तोंडभरून कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केलं आहे. 'मनातून नेहमीच एक डॉक्टर, माझे सहकारी भागवत कराड यांनी खूप छान काम केलं आहे', असं मोदी यांनी म्हटलं आहे. मोदींच्या ट्वीट भागवत कराड यांनी रिट्विट केलं आहे. भागवत कराड यांनीही मोदींचे आभार मानले. तसेच आपण दाखवलेल्या सेवा आणि समर्पणाच्या माध्यमातून देशाची आणि जनतेच्या सेवेचं अनुकरण करत आहे', असं कराड यांनी म्हटलं आहे.

इंडिगोच्या याच विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने भागवत कराडांनी केलेल्या मदतीबद्दलचं ट्वीट केलं होतं. त्या व्यक्तीने मदत करतानाचा फोटोही ट्वीट केला होता. हे ट्वीट रिट्विट करत इंडिगोनं कराड यांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in