दिल्लीतल्या बैठकीत शरद पवारांनी शिवसेनेबाबत काय म्हटलं? सुधींद्र कुलकर्णींनी दिलं उत्तर

सुधींद्र कुलकर्णी हे या बैठकीला उपस्थित होते
दिल्लीतल्या बैठकीत शरद पवारांनी शिवसेनेबाबत काय म्हटलं? सुधींद्र कुलकर्णींनी दिलं उत्तर
फोटो MandarDeodhar

दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली बैठक अद्यापही चर्चेत आहे. या बैठकीत शरद पवार यांनी शिवसेनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. या बैठकीत मोदींचा विरोध हा अजेंडा नव्हता. मात्र या बैठकीत शिवसेना नव्हती. तसंच काँग्रेसलाही बोलवण्यात आलं होतं पण त्यांचे प्रतिनिधी येऊ शकले नाहीत. या बैठकीत शिवसेना नव्हती तरीही शिवसेनेबाबत शरद पवार यांनी महत्त्वाचा उल्लेख केला आहे. या बैठकीत सुधींद्र कुलकर्णीही उपस्थित होते. शिवसेनेबाबत शरद पवार यांनी काय म्हटलं आहे त्याचं उत्तर सुधींद्र कुलकर्णी यांनी दिलं आहे.

काय म्हणाले सुधींद्र कुलकर्णी ?

शरद पवार यांनी या बैठकीत अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलं. मंगळवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्ष नव्हता, शिवसेना नव्हती. त्याबाबत शरद पवार असं म्हणाले की राष्ट्र मंच ही देशाचे प्रश्न मांडणारी संघटना आहे. पुढच्या काळात जी बैठक घेतली जाईल त्या बैठकीला शिवसेना आणि काँग्रेस पक्षांच्या प्रतिनिधींनाही बोलवायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यांचं हे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. हा उल्लेख शरद पवार यांनी केला.

शरद पवार हे एक राष्ट्रीय राजकारणाची जाण असलेले राजकीय नेते आहेत. त्यांनी राष्ट्रीय मंचाची बैठक दिल्लीत घ्या आणि ती माझ्या घरी घ्या असं सांगितलं होतं. या बैठकीत शिवसेना नाही याचीही चर्चा रंगली होती आणि काँग्रेस का नाही असाही प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र काँग्रेसच्या प्रतिनिधींना आम्ही कळवलं होतं. काही कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत. शिवसेनेच्या प्रतिनिधींना बोलावलं नव्हतं मात्र यापुढे होणाऱ्या प्रत्येक बैठकीला शिवसेनेला बोलावलं जाईल. तशा सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत असंही सुधींद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

देशासमोर आत्ता सर्वात ज्वलंत प्रश्न आहे तो कोव्हिडचा. कोव्हिडमुळे लोकांचे जे हाल झाले आहेत ते आपण पाहिले आहेत. तसंच ही सगळी परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार कमी पडलं आहे. मोहन भागवत यांनीही त्यांच्या भाषणात असं म्हटलं आहे की सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे. कोव्हिड क्रायसिससोबतच देशात आर्थिक संकटही आहे. देशातल्या बेरोजागारीचे आकडे तर धक्कादायक आहेत. CMIE ने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय स्वातंत्र्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी कधीही नव्हती.

दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल स्वस्त आहे. तरीही पेट्रोल डिझेलवरच्या टॅक्सच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये सरकार घेतं आहे. त्यांचं आर्थिक अपयश लपवण्यासाठी दरवाढ केली जाते आहे. आणखी एक ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा. हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेशचे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. जगातलं हे सर्वात मोठं आंदोलन कोव्हिड काळातही कायम राहिलं आहे. या सगळ्या समस्या लक्षात घेऊन बैठक बोलवण्यात आली होती असंही कुलकर्णी यांनी मुंबई तकला सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in