पुण्यातील तरुणाईला गुंडांचं आकर्षण का वाटतंय?
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या सुटकेनंतर जी मिरवणूक काढण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्याच्या समर्थकांनी पुण्यापर्यंत जो धुडगूस घातला या सगळ्याच गोष्ट अशोभनीय अशाच आहेत. पण यामुळे काही महत्त्वाचे आणि अत्यंत चिंता निर्माण करणारे प्रश्न पुणेकरांसाठी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा उहापोह करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज पुण्यात ज्या प्रकारे गुंडांचं जे काही […]
ADVERTISEMENT

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या सुटकेनंतर जी मिरवणूक काढण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्याच्या समर्थकांनी पुण्यापर्यंत जो धुडगूस घातला या सगळ्याच गोष्ट अशोभनीय अशाच आहेत. पण यामुळे काही महत्त्वाचे आणि अत्यंत चिंता निर्माण करणारे प्रश्न पुणेकरांसाठी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा उहापोह करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज पुण्यात ज्या प्रकारे गुंडांचं जे काही उदात्तीकरण होत आहे किंवा त्यांची जी क्रेझ वाढत आहे त्यामुळे पुणे आणि त्याच्या आसपासच्या अनेक ग्रामीण भागातील तरुण हे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. ही गोष्ट गजानन मारणेच्या मिरवणुकीवरुन स्पष्ट देखील झाली आहे. पुण्यातील तरुणांना गुन्हेगारांचं आकर्षण का वाटू लागलं आहे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
-
जमिनींना आला सोन्याचा भाव
खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर अशीच त्याची ओळख होती. पण पुणे, जवळील उपनगरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा वेगाने आली त्यामुळे येथील आर्थिक परिस्थिती खूप वेगाने बदलत गेली. पुण्याच्या जवळपासचे ग्रामीण भाग हे आता आयटी आणि औद्योगिक हब बनले आहेत. यामुळे येथील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. यामुळे येथील तरुणांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा आला आणि हीच गोष्ट आता येथील वाढत्या गुन्हेगारीला देखील कारण असल्याचं दिसून येत आहे.
-
गुंडांकडील ब्रँडेड वस्तू ते आलिशान गाड्यांची भुरळ
पुण्याची आर्थिक सुबत्ता वाढत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हे बदल हेरुन आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पण हे ही लोकं फक्त एवढ्यावरच थांबली नाही तर काही तरुण मुलांना हाताशी धरुन त्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसा कमवण्यास सुरुवात केली. यामुळे हळूहळू येथील गुंडांना एक प्रकारचं वलय निर्माण झालं. त्यातूनच वेगवेगळ्या टोळ्यांचा उदय झाला. याच टोळ्यांचे अनेक दादा हे नंतर मोठमोठ्या बॅनरवर झळकू लागले. ब्रँडेड वस्तू, आलिशान गाड्या.. शेकडो लोक मागे-पुढे असणं… याच गोष्टी पुण्यातील तरुणांना आकर्षित करु लागल्या. हळूहळू शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुण देखील या सोन्याच्या पिंजऱ्याकडे आकर्षित होऊ लागला आणि नंतर याच भोवऱ्यात ते दिवसेंदिवस अडकत आहेत.o
-
गुंडांच्या दहशतीचं तरुणांना आकर्षण
कधी काळी मुंबईत ज्या पद्धतीने टोळी युद्ध होत होती तशाच प्रकारचे टोळी युद्ध हे आता आपल्याला पुण्यात पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर क्षुल्लक कारणांवरुन कार किंवा बाइक जळीतकांड देखील वाढू लागले आहे. या सगळ्यात अनेक तरुण मुलं पुढे असल्याची धक्कादायक माहिती आतापर्यंत समोर आली आहे. पुण्यातील ग्रामीण भागाकडून शहराकडे वळलेल्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हळूहळू शहरी भागात आपले ‘अड्डे’ तयार करणं सुरु केलं आहे. इथं भरणारा त्यांचा ‘दरबार’ आणि तिथे असणारी त्यांची ‘दहशत’ यासारख्या गोष्टी देखील तरुणाईला चुकीच्या आकर्षित करु लागली आहे. अनेक कॉलेजवयीन मुलांच्या हाती अवेळी आलेल्या पैशांमुळे देखील ही मुलं संघटित गुन्हेगारीकडे वळत असल्याचं दिसत आहे.
ही बातमी पाहिलीत का?: धक्कादायक, कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा जेल ते पुणे मिरवणूक
-
अनेक कुटुंब लागली देशोधडीला
जमिनीचे व्यवहार आणि खंडणी इथून सुरु झालेला त्यांचा प्रवास अगदी खुनापर्यंत देखील जाऊन पोहचला आहे. त्यामुळे आज अनेकांची कुटुंबं उदध्वस्त झाली आहेत. मात्र, अद्यापही तरुणांच्या डोक्यावरील ही ‘भाईगिरी’ची नशा काही उतरलेलेली नाही. आज ज्याप्रमाणे गुंड गजानन मारणे आणि शरद मोहोळ यांच्या मागे हजारो तरुणांचा ताफा दिसतो ही गोष्ट खूपच चिंताजनक आहे. या गुंडांच्या आहारी जाऊन तरुणांचं भविष्य कधीही सुकर होणार नाही ही गोष्ट माहित असून देखील तरुण त्यांच्याकडे किंवा त्या वृत्तीकडे ओढले जात आहेत. गुंडांच्या दहशतीमुळे त्यांच्याभोवती जे गूढ असं वलय तयार होतं त्याच वलयामुळे तरुण चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत.
-
पुणे पोलीस ठरतायेत अपयशी?
दरम्यान, या सगळ्यात पुणे पोलीस हे मोठ्या प्रमाणात अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे. तरुणाईमध्ये एक जबरदस्त उर्जा असते त्याचा उपयोग हा विधायक कामांसाठी करुन घ्यायचा असतो. पण पुण्यात तरुण ज्या पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत ते पाहता पुण्यातील पोलीस हे तरुणांना योग्य मार्गाकडे वळवण्यात अपयशी ठरल्याचं आढळून आलं आहे. मात्र, असं असलं तरीही अद्यापही वेळ गेलेली नाही. ज्याप्रमाणे मुंबईतील संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यात आली त्याचपद्धतीने पुण्यातही कारवाई होऊ शकते. मात्र यासाठी इच्छाशक्ती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पाहूयात यापुढे पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना यश येतंय की, पूर्वीप्रमाणेच हजारो तरुण हे गुन्हेगारीकडे वळतात…