‘खोटं बोललो तर पवाराची अवलाद सांगणार नाही..’, अजित पवारांनी काय दिलं चॅलेंज?
2017 साली शरद पवार यांनी शिवसेनेला हटवून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा केली होती. असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी आपल्या भाषणात केलं आहे.
ADVERTISEMENT

Ajit Pawar Speech: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाची आज (5 जुलै) वांद्रे येथे बैठक पार पडली. यावेळी बंड केलेल्या अनेक नेत्यांनी बऱ्याच मुद्द्यांवरुन थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. याच वेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) तर अनेक गोष्टींबाबत शरद पवारांनी विपरित भूमिका घेतल्याचं म्हणत शब्द न पाळल्याचे आरोपही केले आहेत. याशिवाय शरद पवारांनी अनेकदा भाजपसोबत (BJP) सत्ता बनविण्याबाबत चर्चा केली होती. असा गौप्यस्फोट अजित पवारांनी आपल्या भाषणात केला आहे. (2017 sharad pawar talks with bjp remove shiv sena form government with ncp ajit pawar big secret explosion speech)
‘कुठली खाती, कुठली पालकमंत्री पदं सगळं ठरलं होतं.. मी कधीही महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवाराची अवलाद सांगणार नाही.. त्यामध्ये ते ठरलं.. आम्हाला निरोप आला.. सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं. दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांच्या बरोबर आपले वरिष्ठ आणि सुनील तटकरेंची बैठक झाली होती. पण शरद पवारांना शिवसेना सत्तेत नको होती म्हणून भाजपसोबतची ठरलेली समीकरणं ही शेवटच्या क्षणी रद्द झाली.’ असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
‘शरद पवारांनी आम्हाला सांगितलं वानखेडेवर शपथविधीला जा…’
‘2014 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आम्ही सगळे जणं सिल्व्हर ओकला बसलो होतो. निकाल येत होते. प्रफुल भाई आणि साहेबांचं बोलणं झालं. प्रफुल भाईंनी सांगितलं की, आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा देतो. आम्ही गप्प बसलो.. का तर नेत्यांचा निर्णय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं सगळ्यांनी वानखेडेला शपथविधीला जा.. आम्ही सगळेजण शपथविधीला गेलो. नरेंद्र मोदी साहेब मला ओळखतात.. मी त्यांना ओळखतो. त्यामुळे ते म्हणाले अजितजी कैसे हो.. साहब की कैसी है तबियत.. ते बाकीच्यांशी पण बोलले.’
‘जर आपल्याला त्यांच्यासोबत जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं होतं तिथे. त्यानंतर पुन्हा काही घडलं त्या खोलात मी जात नाही.’ असं अजित पवार म्हणाले.