एकनाथ शिंदेंना नको तेच होणार; अजित पवारांकडे जाणार तिजोरीच्या चाव्या!
पुन्हा एकदा अजित पवारांकडेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदेंविरोधात ठाकरेंना बोलण्यासाठी आयता मुद्दा मिळेल असंही म्हटलं जात आहे.

Ajit Pawar, Politics of Maharashtra : अजित पवारांचा भाजपसोबतचा घरोबा एकनाथ शिंदेंसाठी आगामी काळात अडचणीचा ठरण्याची चिन्हं दिसत आहे. निधी वाटपातील अन्यायाच्या मुद्द्यावर बोट ठेवत शिंदेंच्या आमदारांनी बंडासाठी अजित पवारांनाही जबाबदार धरलं. पण, आता पुन्हा एकदा अजित पवारांकडेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदेंविरोधात ठाकरेंना बोलण्यासाठी आयता मुद्दा मिळेल असंही म्हटलं जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे अर्थ व नियोजन मंत्री होते. अजित पवार यांच्याकडून निधी वाटप करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना झुकत माप दिलं जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरीनंतर केला होता.
वाचा >> ‘शरद पवार हे सैतान, ते पुन्हा येता कामा नये’, सदाभाऊ खोतांचा सुटला तोल
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदारांनाही निधी देताहेत. मुख्यमंत्र्यांकडे (उद्धव ठाकरे) तक्रार करूनही ते काहीही करत नसल्याचा सूर बंडखोर आमदारांनी त्यावेळी लावला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचे काम करत आहे, असंही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड करणाऱ्या आमदारांनी म्हटलं होतं. पण, वर्षभरातच आता एकनाथ शिंदे कात्रीत सापडताना दिसत आहे.
अजित पवार होणार राज्याचे अर्थमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांनी भाजप-शिवसेना सरकारमध्ये उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते जाणार असल्याचे म्हटले जात आहे. “अजित पवार हे आता परत वित्त व नियोजन खात्याचे मंत्री होतील, ही फक्त औपचारिकता राहिली आहे. अजित पवारांच्या गटातील माझ्या सुत्रांनी सांगितलं की, मूळात अजित पवार जेव्हा भाजपसोबत ही बोलणी करत होते. त्यावेळी वित्त व नियोजन हे खातं त्यांच्याकडेच राहील अशीच बोलणी होती”, असं राजकीय पत्रकार संजय जोग यांनी मुंबई Tak शी बोलताना सांगितलं.
Explainer : शरद पवारांनी ‘हुकुमी पत्ते’ केले ओपन, आता भुजबळांसाठी लढाई अवघड?
ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि त्यांच्याकडून असं सांगितलं गेलं की आम्ही दोन महिने बसून नव्हतो. त्यामुळे शिंदे गटाने कितीही आकांडतांडव केलं असलं, तरी अजित पवारांसाठी वित्त आणि नियोजन हे खातं महत्त्वाचं आहे.”
अजित पवारांना का हवंय वित्त आणि नियोजन खातं?
संजय जोग असं म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. पण, त्याची अंमलबजावणी करायची आहे अजित पवारांना. आता हे खातं त्यांच्यासाठी का महत्त्वाचं आहे, तर अजित पवारांनी सांगून टाकलंय की, आगामी विधानसभा निवडणुकीत ते 90 जागा लढवणार आणि किमान 12 ते 13 लोकसभेच्या जागा लढवू. इथेच महत्त्वाचा मुद्दा आहे. अजित पवार कितीही म्हणाले की, मागच्या वेळीही दुजाभाव केला नव्हता. यावेळीही तसं करणार नाही, तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष्य पश्चिम महाराष्ट्र आहे. त्यानंतर आता ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेश, त्याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जे प्रकल्प हाती घेतलेले आहेत.”
“जेव्हा एखाद्या पक्षाचा नेता वित्त आणि नियोजन मंत्री असतो. तेव्हा त्याच्या आमदारांकडे आणि नेत्यांकडे त्यांचा कल जातोच. त्याचा फायदा अजित पवार घेणार आहेत. पक्ष बळकट करणे, मतदारांना आकृष्ट करणे, हे होतं”, संजय जोग यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंकडून मेसेज देण्याचा प्रयत्न
“शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये झटापट झाली आणि मुख्यमंत्री नागपुरचा दौरा सोडून आले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, शेवटी मी मुख्यमंत्री आहे. पण, अजितदादा जे नेहमी सांगतात की, 2004 साली जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, तर ते आतापर्यंत टिकलं असते. त्यामुळे पक्षाची सरकारमध्ये वजन वाढलं असतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना (शिंदे) हाच मेसेज द्यायचा आहे की, अजित पवार हे वित्त मंत्री झाले तरी माझ्या सहीशिवाय कुठलीही फाईल जाणार नाही. खरी मेख इथे आहे”, असं जोग म्हणाले.
वाचा >> Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट, फायदा होणार काँग्रेसला
“भाजपचे विधानसभा निवडणुकीसाठी मिशन 250 पेक्षा अधिक जागांचं आहे. तर लोकसभेसाठी 45 पेक्षा जास्त जागांचं आहे. त्यामुळे एकीकडे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर मंत्री. त्यामुळे आता आलेला जीआर आलेला आहे, त्यातून त्यांना जो मेसेज द्यायचा होता, तो दिला गेला आहे”, असंही संजय जोग यांनी सांगितलं.