मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीत बसले अजित पवार; नार्वेकरांनी काय केले?
मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अजित पवार यांना बसवले.
ADVERTISEMENT

Maharashtra politics : एकीकडे शिवसेनेच्या 16 आमदारांचा अपात्रतेचा प्रलंबित असलेला निर्णय… दुसरीकडे अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा… यातच गुरुवारी (3 ऑगस्ट) मुंबईत एक मजेशीर राजकीय प्रसंग घडला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसवलं. खुर्चीचा हा किस्सा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.
झालं असं की मुंबईतील नरिमन पाईंट परिसरात आमदार निवासाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन गुरूवारी झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित राहणार होते. पण, ते या कार्यक्रमाला आलेच नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही मनोरा आमदार निवास भूमिपूजन कार्यक्रमाचा समावेश नव्हता.
वाचा >> “शरद पवारांनी, ब्रेकअप स्टंट करून जनतेला मुर्ख बनवू नये”, प्रकाश आंबेडकरांनी सुनावलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सभागृहातच दिली होती. त्यामुळे व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही खुर्ची ठेवण्यात आली होती.
नार्वेकरांनी अजित पवारांना बसवलं मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या शेजारी विधानसभा अध्यक्षांची खुर्ची होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. यावेळी एकनाथ शिंदे कार्यक्रमाला न आल्यामुळे खुर्ची रिकामी होती. राहुल नार्वेकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्र्यासाठी ठेवलेल्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. मात्र, अजित पवारांनी नकार दिला. पण, राहुल नार्वेकरांनी आग्रह केल्याने अजित पवार त्या खुर्चीवर बसले. अजित पवार बसत असतानाच राहुल नार्वेकरांनी खुर्चीवर लावलेलं एकनाथ शिंदेंच्या नावाचं स्टिकर काढलं आणि त्याची घडी केली.










