सुनील तटकरेंचा पत्ता होणार कट? भाजपचा रायगड लोकसभेसाठी प्लॅन काय?
जशी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये काही मतदारसंघांसाठी रस्सीखेच सुरू आहे, तशीच ती महायुतीमध्येही सुरू आहे. यात एक मतदारसंघ रायगडचाही आहे.
ADVERTISEMENT

Sunil Tatkare Rajya Sabha Election : महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. या सहा जागांसाठी वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावाची चर्चा होत आहे. यात एक नाव आहे सुनील तटकरे यांचं. (Uddhav Thackeray claims that Sunil Tatkare willing to fight Rajya Sabha Election )
सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि अजित पवारांनी आगामी लोकसभेच्या अनुषंगाने या मतदारसंघावर दावाही केला आहे. पण या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा स्थानिक राजकारणात सुरू आहे. या चर्चेला हवा मिळाली ती उद्धव ठाकरेंनी रायगड दौऱ्यात केलेल्या विधानामुळे!
सुनील तटकरे राज्यसभेसाठी इच्छुक?
1 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे रायगडच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पेण येथील जनसंवाद सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी तटकरेंबद्दल विधान केले. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना आव्हान देताना ठाकरे तटकरेंचं नाव घेऊन बोलले. ते काय म्हणाले तेही वाचा…
“कल्याणमध्ये मी गेलो, त्याच्या एक-दोन दिवस आधी मोदीजी येऊन गेले आणि घराणेशाहीवर बोलून गेले. घराणेशाही… मी दुसऱ्या दिवशी गेलो आणि म्हटलं की घराणेशाहीला विरोध आहेच. पण, कल्याणमध्ये आणि योगायोग इथे (रायगड), पलिकडे कोकणात सुद्धा घराणेशाही… घराणेशाहीच नाही, तर गद्दारांची घराणेशाही आहे.”
“मोदींजीच्या भाषेत… आता जे खासदार निवडून दिलेत, इकडे पालकमंत्री आहेत… भाजपने जाहीर करावं की आम्ही त्यांना तिकीट देणार नाही, ही घराणेशाही आम्ही इकडेच बंद करणार. हिंमत असेल, तर करा. ना राज्यसभेत पाठवणार, ना विधान परिषदेत पाठवणार.”
“अशीही कुजबूज येतेय… त्यांना आता कळलंय की, लोकसभेत तर आता निवडून येऊच शकत नाही, मग मागच्या दारातून तटकरे राज्यसभेत जाण्याचा प्रयत्न करतील. मोदींनी सांगायला पाहिजे गेट आऊट. मला घराणेशाही चालणार नाही. पालकमंत्री असेल, तर तू पालक आणि तुझी मुलगी घरी काय ते करा… इथे माझ्या पक्षात स्थान नाही.”
सुनील तटकरे लोकसभेचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाणार का? अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानाने चर्चेला हवा दिली आहे.










