संजय राऊत म्हणतात राज्यात लवकरच सत्तांतर, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, "त्यांना स्वप्नं...."

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी खास शैली उत्तर दिलं आहे
 Chief minister eknath shinde Answer on shivsena sanjay raut maharashtra government Reaction
Chief minister eknath shinde Answer on shivsena sanjay raut maharashtra government Reaction

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एक वक्तव्य केलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की राज्यात लवकरच सत्तांतर झालेलं आपल्याला पाहण्यास मिळेल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी संजय राऊत यांना उद्देशून उत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना त्यांनी चांगलाच टोलाही लगावला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर संजय राऊत यांच्याविषयी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

"सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत याची खात्री आहे. १६ आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मात्र त्यानंतर हे आमदार स्वतःला शिवसैनिक म्हणवू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही" असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना काय उत्तर दिलं?

"संजय राऊत यांना स्वप्नं पाहण्याची सवय आहे, त्यांना स्वप्नं पाहू द्या. राज्यात १६६ लोकांच्या बहुमताचं सरकार आहे. लोकसभेतही १२ खासदारांनी अध्यक्षांना पत्र दिलं आहे. दोन्ही सभागृहात आमच्याकडे बहुमत आहे. सरकार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे संजय राऊत यांना स्वप्नं पाहू द्या." असं उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

ओबीसीचं आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होतं त्यामुळे मी तीन ते चारवेळा दिल्लीत गेलो. मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञ वकील, वरिष्ठ विधीज्ञ यांच्यासोबत बैठका घेतल्या. त्यातून या राज्यातील ओबीसी समाजाला या सरकारने न्याय दिला आहे. याबाबत मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एवढंच नाही तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. राज्याचा कारभार मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहे. अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या पाठिशीही आम्ही उभे आहोत. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. जनतेच्या हितात कोणतीही बाधा येणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in