Sanjay Raut : शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलनंतरच अजितदादांबद्दल राऊत रोखठोक?
शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलनंतरच राऊतांनी अजित पवारांबद्दल रोखठोक भुमिका मांडली का, दादांच्या बंडाची मागणी पवारांच्या सांगण्यावरूनच राऊतांनी लीक केली का, अशा चर्चा सुरू झाल्यात.
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीतील बंड राहिलं, बाजूला पण आता संजय राऊत (Sanjay Raut) आणि अजित पवारांमध्येच (Ajit Pawar) वादाचा खटका उडालाय. पवार-राऊतांमध्ये वार-पलटवार सुरू झालाय. अजित पवारांनी हा वाद पक्षाच्या पातळीवर मांडणार असल्याचं म्हटलंय. तर राऊतांनी विषय शरद पवारांच्या (Sharad Pawar) कोर्टात नेलाय. त्यामुळेच शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलनंतरच राऊतांनी अजित पवारांबद्दल रोखठोक भुमिका मांडली का, दादांच्या बंडाची मागणी पवारांच्या सांगण्यावरूनच राऊतांनी लीक केली का, अशा चर्चा सुरू झाल्यात.
पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा अजित पवारांभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं. आणि हा संशय दुसऱ्यातिसऱ्या कुठून नाही, तर शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या संजय राऊतांच्या रोखठोकमुळे निर्माण झाला.
संजय राऊतांनी १६ एप्रिलला रविवारी रोखठोक सदरात महाराष्ट्रात फोडाफोडीचा सीझन टू सुरू असल्याचा दावा केला. आतापर्यंत दबक्या आवाज सुरू असलेल्या या चर्चांना राऊतांनी शरद पवारांचा हवाला दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
शरद पवारांसोबत बैठक अन् रोखठोक
त्याचं झालं, असं की उद्धव ठाकरे राऊतांसोबत ११ एप्रिलला मंगळवारी सिल्वर ओकवर शरद पवारांना भेटायला गेले. यावेळी सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती होती. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.










