एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार?; शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका
‘येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून चर्चा करायला एकत्र येणार, हे समजल्यावर खूप बरं वाटलं,’ असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ठाकरे-शिंदे मनोमिलनाच्या शक्यतेबद्दल मोठं विधान केलं. या विधानावरुन राज्यात चर्चा सुरू झाली आणि दिल्लीत खासदार संजय राऊतांनी वेगळी भूमिका मांडली, त्यामुळे शिंदे-ठाकरे यांच्या भेटीवरून संभ्रम निर्माण […]
ADVERTISEMENT

‘येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून चर्चा करायला एकत्र येणार, हे समजल्यावर खूप बरं वाटलं,’ असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ठाकरे-शिंदे मनोमिलनाच्या शक्यतेबद्दल मोठं विधान केलं. या विधानावरुन राज्यात चर्चा सुरू झाली आणि दिल्लीत खासदार संजय राऊतांनी वेगळी भूमिका मांडली, त्यामुळे शिंदे-ठाकरे यांच्या भेटीवरून संभ्रम निर्माण झालाय.
दिपाली सय्यद काय म्हणाल्या आहेत?
‘येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं आहे. या मध्यस्थी करीता भाजप नेत्यांनी मदत केली, याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल,’ असं दिपाली सय्यद यांनी ट्विट करून सांगितलं.
‘…याच भयातून शिवसेना फोडली अन् उद्धव ठाकरेंचे पाय खेचले’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचे आभार?
दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. ट्विटमध्ये भाजपच्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला नसला, तरी त्यांनी हे ट्विट भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेल्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना टॅग केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं मनोमिलन घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.