'पोलिसांकडून माहिती आलीये', एकनाथ शिंदे भडकले, विरोधकांना सुनावलं

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात उत्तर, यावेळी राजकारण करू नका म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलं
eknath shinde gets angry after opposition raised maharashtra karnataka border dispute
eknath shinde gets angry after opposition raised maharashtra karnataka border dispute

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा अपेक्षेप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या बैठकीबद्दल आणि कर्नाटक सरकारच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला मुद्दा सभागृहाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यात वाद नाही. आपण म्हणालात की केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर काय झालं. आम्ही दोघंही (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) होतो. यामध्ये पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. मध्यस्थी केली. बैठक बोलावली. मला वाटतं गेल्या अनेक वर्षामध्ये हे पहिल्यांदा घडलं आहे.'

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, 'त्यांनी (अमित शाह) ही बाब गांभीर्याने घेतली. आम्ही त्यांना विनंती केली की, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या बाजूने, सीमावासियांच्या बाजूने ठोस भूमिका घेतली. आम्ही सांगितलं की, आमच्या गाड्या, आमचे लोक जातात. त्यांना अडवलं जातं. त्यांच्या गाड्या फोडल्या जातात. हे प्रकार कायदा सुव्यवस्था आणि लोकशाहीला धरून नाहीत. अॅक्शनला रिअॅक्शन होऊ शकते, हे देखील आम्ही स्पष्टपणे मांडलं,' अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

अमित शाहांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना समज दिलीये -एकनाथ शिंदे

'गृहमंत्र्यांनी त्यांना (कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई) योग्य सूचना, समज दिली. कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारचं कृत्ये, अशा प्रकारची घटना होता कामा नये. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्यांनी (अमित शाह) स्वतः माध्यमांसमोर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन करायला पाहिजे होतं,' म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'यापूर्वी कुठली कुठली सरकार केंद्रात होती. महाराष्ट्रात होती. कर्नाटकाच होती, हे तुम्हाला माहिती आहे. एकीकरण समितीचं आंदोलन यापूर्वी कुठल्या सरकारमध्ये झालंय. कुठल्या सरकारने याला परवानगी दिली नाही आणि कुठल्या सरकारने दिली याची माहिती घ्या.'

'तुम्ही योजना बंद केल्या', महाविकास आघाडीवर शिंदे संतापले

एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सीमावादावरून लक्ष्य केलं. शिंदे म्हणाले, 'आपण सीमावासीयांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला खूप विषय आहेत. यापूर्वीच्या सरकारने (महाविकास आघाडी) मुख्यमंत्री धर्मदाय निधीचे पैसे बंद केले होते. त्या ठिकाणच्या योजना बंद केल्या होत्या. आम्ही चार महिन्यात सरकार आल्यानंतर पहिलं ते सुरू केलं. आम्हाला यात राजकारण करायचं नाही.'

'सीमावासीय ठराव करताहेत, असं तुम्ही म्हणालात. त्या ठरावांमागे कुठले पक्ष आहेत, याचीही माहिती आम्हाला पोलिसांकडून आली आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही 48 गावांसाठी 2 हजार कोटींची योजना मंजूर केली. शासनाच्या माध्यमातून आम्ही देऊ,' अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

बसवराज बोम्मईंच्या ट्विटबद्दल एकनाथ शिंदेंनी सभागृहात काय सांगितलं?

'आम्ही त्या मुख्यमंत्र्यांना समोरासमोर सांगितलं की, तुम्ही ट्विट करताहेत, ते ट्विट चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं की, ते ट्विट आमचं नाहीये. त्याचीही माहिती त्यांना मिळाली आहे. त्याची माहिती सभागृहात मिळेल. त्या ट्विटमागे कुठला पक्ष आहे, याचीही माहिती मिळेल', असं सांगत एकनाथ शिंदे विरोधकांवर हल्ला चढवला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in