हात जोडून माफी मागा नाहीतर अयोध्येत घुसू देणार नाही - भाजप खासदाराने राज ठाकरेंना सुनावलं

राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय योगी आदित्यनाथांनी त्यांची भेट घेऊ नये - खासदार ब्रिजभूषण सिंग
हात जोडून माफी मागा नाहीतर अयोध्येत घुसू देणार नाही - भाजप खासदाराने राज ठाकरेंना सुनावलं

मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा चर्चेत आणून हिंदुत्वाची कास धरलेल्या राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे. परंतू राज यांच्या अयोध्या दौऱ्याला आता भाजपकडूनच विरोध होताना दिसत आहे. उत्तरप्रदेशमधील कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत घुसू देणार नाही अशी धमकी दिली आहे.

मध्यंतरीच्या काळात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरुद्ध आंदोलन केलं होतं. मनसे सैनिकांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर अनेक उत्तर भारतीयांना मारहाणही केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांना अयोध्येत यायचं असेल तर त्यांनी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी. माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही असं ब्रिजभूषण म्हणाले आहेत.

इतकच नव्हे तर ब्रिजभूषण सिंग यांनी जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची भेट घेऊ नयेत असंही ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे. राम मंदिर आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सामान्य लोकांचं योगदान होतं. यात ठाकरे परिवाराचं काहीही घेणंदेणं नव्हतं असंही ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे.

मनसेचा जन्म झाल्यापासून राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला होता. मध्यंतरीच्या काळात मनसे सैनिकांनी कल्याण आणि मुंबईत रेल्वे परीक्षांसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. राज ठाकरेंच्या या आंदोलनाला तेव्हा भरपूर प्रतिसाद मिळाला...ज्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले. कालांतराने मनसेला उतरती कळा लागल्यानंतर राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरुद्धची आपली भूमिका नरम केलेली पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगलेल्या होत्या.

मनसे आणि भाजप एकत्र येण्यासाठी राज ठाकरेंची उत्तर भारतीयांविरोधातली भूमिका हाच एक मोठा कळीचा मुद्दा असल्याचं भाजपने सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या संमेलनातही हजेरी लावून आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंना होत असलेला विरोध आता असाच कायम राहतो की मावळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.