Yogesh Kadam: 'मी सुरतला पळून गेलेलो नाही, आदित्य साहेबांना सांगून गेलो होतो'

शिंदे गटात गेलेले खेड- दापोलीचे आमदार योगेश कदम आज मतदारसंघात दाखल झाले.
Yogesh Kadam: 'मी सुरतला पळून गेलेलो नाही, आदित्य साहेबांना सांगून गेलो होतो'

राकेश गुडेकर

रत्नागिरी: शिंदे गटात गेलेले खेड- दापोलीचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) आज मतदारसंघात दाखल झाले. त्यांचं जंगी स्वागत खेडमध्ये करण्यात आलं. दरम्यान माजी पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी वारंवार माझं खच्चीकरण केलं, पक्षश्रेष्ठींकडे व्यथा मांडूनही मला न्याय मिळाला नाही, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला असं त्यांनी स्पष्ट केलं.

हा निर्णय घेण्यासाठी मला भाग पाडलं गेलं, असं सांगत माजी पालकमंत्री अनिल परब यांनी आपल्याबाबत कसा दुजाभाव केला गेला, आपल्यावर कसा अन्याय झाला हे शिंदे गटात गेलेले खेड-दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी आज आपल्या मतदारसंघात आल्यावर स्पष्ट केलं.

योगेश कदमांनी (Yogesh Kadam) अनिल परबांवर केले गंभीर आरोप

आज मतदारसंघात आल्यावर त्यांचं जंगी स्वागत खेडमध्ये ठिकठिकाणी करण्यात आलं. पाऊस असतानाही कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून येत होता. यावेळी योगेश कदम म्हणाले की, माजी पालकमंत्री अनिल परब यांनी माझं वारंवार खच्चीकरण केलं. माझ्यासमोर पडलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ते जिल्हा नियोजनमधून ते निधी देत असत. मला मात्र कमी निधी देत. राष्ट्रवादीला हाताशी धरून मला संपवलं जात होतं. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना अनिल परब यांनी पदं दिली.

''आदित्या साहेबांना (Aaditya Thackeray) सांगून सुरतला गेलो''

दापोली- मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीशी युती करण्यात आली, आणि हे शिवसैनिकांना मान्य नव्हतं. मी वारंवार हे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिलं पण न्याय मिळाला नाही, त्यामुळेच यावेळी मला हा निर्णय घ्यावा लागला असं योगेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच मी काही पळून सुरतला गेलो नाही, जाताना आदित्य साहेबांना सांगून गेलो होतो, असंही आमदार योगेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तसेच माझ्या मतदारसंघात जो मला त्रास दिला जात होता, ते रामदास भाईंनी पाहिलं होतं, त्यांच्याही डोळ्यांत अश्रू होते, त्यामुळे त्यांनी माझा निर्णय घेण्यासाठी मला स्वातंत्र्य दिलं होतं. हेही योगेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं. आम्ही धनाने तिकडे गेलो असं राऊत साहेब म्हणत आहेत, मग त्यांनी पुरावे द्यावेत.. असं थेट आव्हान योगेश कदम यांनी दिलं आहे. तसेच आम्ही आजही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच आहोत असंही योगेश कदम यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in