पृथ्वीराज चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? फ्लेक्सवरुन काँग्रेस गायब
सातारा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काल पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरात घेतलेल्या एका कार्यक्रमात फ्लेक्सवर कोणत्याही काँग्रेस नेत्याचे फोटो अथवा चिन्ह न दिसल्याने सोशल मीडियावर पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस […]
ADVERTISEMENT

सातारा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काल पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरात घेतलेल्या एका कार्यक्रमात फ्लेक्सवर कोणत्याही काँग्रेस नेत्याचे फोटो अथवा चिन्ह न दिसल्याने सोशल मीडियावर पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस नेतृत्वावर केलेल्या विधानांमुळेही चव्हाण यांच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा आहेत.
पृथ्वीराज चव्हाण राजकारणापासून अलिप्त राहणार?
चव्हाण यांच्या राजकारणाचा विचार केल्यास गेली चार दशके गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले कुटुंबीय काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात जातील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे ते राजकारणापासून अलिप्त राहतील अशी देखील चर्चा सुरु आहे. मात्र या सर्व चर्चांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. पुढील महिन्यातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरच याबाबत निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे.
पृथ्वीराज चव्हाण – गुलाम नबी आझाद भेट :
अलिकडेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह G-23 मधील वरिष्ठ नेते आनंद शर्मा आणि भुपेंदरसिंह हुड्डा यांनी काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार असणार चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नसल्याचे चव्हाण यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर बोलताना चव्हाण म्हणाले होते, मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नाही. मी उमेदवार असणार नाही. मात्र जवळपास अनेक वर्षांनंतर अध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याचा आनंद आहे. उमेदवार कोण असणार, निवडणुकीबाबत रणनीती काय असणार या सगळ्यावर येत्या काळात चर्चा होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.