उद्धव ठाकरेंचा उल्लेख, PM नरेंद्र मोदींवर घणाघात; शरद पवार काय बोलले?
शरद पवार यांनी निपाणीत झालेल्या सभेत मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला. हिंसाचार उफाळलेला असताना पंतप्रधान कर्नाटकात प्रचार करत असल्याच्या मुद्द्यावरून पवारांनी मोदींना खडेबोल सुनावले.
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली. कर्नाटकात विधानसभा निवडणूक होत असून, शरद पवार यांची प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सभा झाली. या सभेत पवारांनी कर्नाटकातील भाजप सरकारसह पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलं. यावेळी शरद पवार यांनी कर्नाटकात भ्रष्टाचार वाढला असल्याचा मुद्दाही अधोरेखित केला.
शरद पवार यांनी निपाणीत झालेल्या सभेत मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला. हिंसाचार उफाळलेला असताना पंतप्रधान कर्नाटकात प्रचार करत असल्याच्या मुद्द्यावरून पवारांनी मोदींना खडेबोल सुनावले.
शिव्यांवरून पवार मोदींना काय म्हणाले?
कर्नाटक निवडणुकीत निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना पवार म्हणाले, “आज देशात वेगळे चित्र आहे. निवडणूक कर्नाटकमधील आहे परंतु संपूर्ण देशाचे चित्र पाहिले तर नवनवीन समस्या दिसत आहेत. देशाच्या सीमेवरील राज्यात शांतता असणे गरजेचे आहे. मणिपूर येथे मागील सहा दिवस संघर्ष सुरु आहे, ज्यात 54 विद्यार्थी आणि तरूण मृत्यूमुखी पडले. याठिकाणी सत्ता भाजपची आहे. ज्यांच्या हाती देश आहे त्यांना मणिपूरसारखे राज्य सांभाळता येत नाही. तर मतं मागण्यासाठी प्रधानमंत्री कर्नाटकात हिंडत आहेत. ते फिरत असताना काँग्रेस आणि विरोधकांना शिव्या देतात. खरंतर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या हाती असलेल्या सत्तेचा वापर करून मणिपूर कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, पण त्यांचे लक्ष त्याठिकाणी दिसत नाही.”
हेही वाचा >> DRDO: पाक ललनेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेला प्रदीप कुरूळकर आहे तरी कोण?
“कर्नाटकमध्येही भाजपचे राज्य आहे. खरंतर अनेक ठिकाणी भाजप सत्तेत निवडून आलेला नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार फोडून त्यांनी सत्तांतर केले. मध्य प्रदेश आणि अशी अनेक राज्यं सांगता येतील जिथे धनाचा वापर करून माणसे फोडणे आणि त्यातून सरकार बनवणे ही भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. त्याला कर्नाटकही अपवाद नाही. म्हणून या देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे”, असं आवाहन पवारांनी मतदारांना केलं.