गजानन किर्तीकर ठाकरेंसोबतच राहणार : शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम

दोन दिवसांपूर्वी खासदार किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट
Gajanan Kirtikar - Uddhav Thackeray
Gajanan Kirtikar - Uddhav Thackeray Mumbai Tak

मुंबई : खासदार गजानन किर्तीकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहेत. 'मुंबई तक'शी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांणा उधाणं आलं होतं.

'मुंबई तक'शी बोलताना खासदार किर्तीकर म्हणाले, मी शिंदे गटात जाणार नाही. परवा मी वर्षा बंगल्यावर फक्त गणपती दर्शनाला गेलो होतो. यापूर्वीही विलासराव देशमुख यांच्या काळापासून मी प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो आहे, त्यात नवीन काहीच नाही. मी एकनाथ शिंदे यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. ते सध्या मुख्यमंत्री आहेत. शिवाय मला माझ्या मतदारसंघाची काही काम वगैरे असली तर जावं लागतं. त्यामुळेच मी त्यांच्याकडे गेलो होतो.

सहा सप्टेंबरच्या मध्यरात्री खासदार गजानन किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावेळी खासदार किर्तीकर हे मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनाला गेले होते, असे सांगण्यात आले होते. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणपती दर्शनासह या भेटीत राजकीय चर्चाही झाली होती. याच भेटीनंतर खासदार किर्तीकर देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली गेली.

मात्र आता स्वतः किर्तीकर यांनी आपण शिंदे गटात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान किर्तीकर यांच्या या निर्णयामागे त्यांचा मुलगा आणि शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर यांचा विरोध असल्याचेही विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. शिवेसना आणि उद्धव ठाकरे संकटात असातना त्यांची साथ सोडली तर देव मला माफ करणार नाही. असा निर्णय घेतला तर माझ्या सारखादुसरा मतलबी नसेल, अशी प्रतिक्रिया अमोल किर्तीकर यांनी माध्यमांशी दिली.

यापूर्वीही झालीही होती शिंदे-किर्तीकर यांची भेट :

सत्तेत आल्यानंतर जुलै महिन्यामध्येही एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी ही राजकीय भेट नसल्याचे म्हटले होते. किर्तीकर आजारी असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगण्यात आले होते.

एकनाथ शिंदे यांनी सध्या थेट पक्षावरच दावा सांगितला आहे. यावर न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानेही उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी शिंदे यांना प्राथमिक टप्प्यात पक्षात उभी फूट पडल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.

त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकारिणीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, आणि मनोहर जोशी यांचीही भेट घेतली होती. या नेत्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठीच शिंदे यांचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले गेले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in