Parliament: “मोदी-शाहांनी डॉ. आंबेडकर, सरदार पटेलांनाही…”, ठाकरेंचा घणाघाती हल्ला
Opposition MPs suspension News : विरोधी बाकावरील 143 खासदारांना निलंबित करण्याच्या कारवाईवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंनी थेट मोदी-शाहांवरच हल्ला चढवला आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on MPs Suspension : हिवाळी अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहातील 143 निलंबित करण्यात आले. संसदेत झालेल्या घुसखोरीच्या प्रकारावर निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून गदारोळ घातल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवर बोट ठेवत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी- केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर घणाघाती हल्ला केला. (Row over Opposition MPs suspension in Lok Sabha)
‘संसदेचे स्मशान झाले’, या सामनात लिहिलेल्या अग्रलेखातून ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकेचे बाण डागले. “संसदेचे अधिवेशन सुरू आहे व घुसखोरीबाबत पंतप्रधान, गृहमंत्री बाहेर खुलासे करीत फिरत आहेत. यावर जाब विचारणाऱ्या 143 खासदारांना सरकारने निलंबित केले. पुन्हा विरोधकांवर ठपका ठेवून पंतप्रधान मोदी लोकशाहीची मिमिक्री करीत आहेत. संसदेतील घुसखोरीसंदर्भात एक चार ओळींचे निवेदनच करायचे होते, पण त्याऐवजी लोकसभा, राज्यसभेतून विरोधकांना हाकलून दिले गेले व लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराचे सरकारने स्मशान करून ठेवले”, असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेने केला.
“ईव्हीएम है तो मोदी है”, ठाकरेंनी केली बॅलेट पेपरची मागणी
ठाकरेंनी पुन्हा एकदा ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केली आहे. “मोदी यांचे म्हणणे असे की, ‘विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यामुळे विपक्ष हताश झाला आहे व संसदेतील घुसखोरी प्रकरणाचे राजकारण करीत आहे.’ मोदी यांच्या बोलण्यास अर्थ नाही. विपक्ष हताश वगैरे झालेला नाही. ‘ईव्हीएम है तो मोदी है’ हाच चार राज्यांच्या निकालांचा अर्थ आहे. विपक्ष पराभवामुळे हताश झाला नसून भाजप व त्यांच्या नेत्यांना विजयाची नशा आणि उन्माद चढला आहे”, अशा शब्दात ठाकरेंनी मोदींना सुनावले आहे.
हेही वाचा >> फडणवीस-पवारांचा पहाटेचा शपथविधी शिंदेना भोवणार? ठाकरेंच्या वकिलांनी गाठलं खिंडीत
“प्रचंड बहुमत असूनही मोदी व त्यांचे सरकार विरोधकांना इतके का घाबरते? याचे उत्तर त्यांचे बहुमत खरे नाही असे आहे. मोदी यांनी अंधभक्तांच्या फौजा निर्माण केल्या आहेत व हे अंधभक्त भांग प्यायल्याप्रमाणे भक्तीचे तांडव करीत असतात. यातील प्रत्येक जण बेरोजगारीचा स्फोट व त्यातून संसदेत झालेल्या घुसखोरीवर चूप आहे. भक्त अंध आहेत व मुकेही आहेत”, अशा शब्दात भाष्य करण्यात आले आहे.










