बिहारमधील विश्वासदर्शक ठराव नितीश कुमारांनी जिंकला; भाजपचा मतदानावर बहिष्कार

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी फ्लोअर टेस्टवर बहिष्कार टाकला आणि सभागृहातून बाहेर पडले.
Nitish kumar and tejaswi yadav file image
Nitish kumar and tejaswi yadav file image

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारने आज बिहार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. पण फ्लोअर टेस्टच्या वेळी बराच गदारोळ झाला. गदारोळ इतका वाढला होता की, भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी फ्लोअर टेस्टवर बहिष्कार टाकला आणि सभागृहातून बाहेर पडले. त्याचवेळी, फ्लोर टेस्ट दरम्यान, सीएम नितीश आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नितीश यांनी तर 2020 मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपने त्यासाठी दबाव निर्माण केला होता, असं सांगितलं.

नितीश कुमारच्या बाजूने 160 मतं

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या महागठबंधन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बहुमत असूनही सत्ताधाऱ्यांनी मतदान करण्याची मागणी केली होती. तर भाजपने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर होत असताना मतदानाची काय गरज असल्याचे म्हटले. मात्र मतदान झाले आणि भाजपने मतदानावर बहिष्कार टाकला. मतदानात नितीश यांच्या बाजूने 160 मतं पडली.

2020 मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते- नितीश

नितीश यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीपासूनच भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, नंदकिशोर यादव यांना विधानसभेचे अध्यक्ष करतील, असे भाजपने आधी सांगितले होते. मात्र त्यानंतर विजय सिन्हा यांना हे पद देण्यात आले. नितीश पुढे म्हणाले की 2020 मध्ये ज्यांचे जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असं ठरवलं होतं. मात्र, भाजपने माझ्यावर दबाव आणत मुख्यमंत्री होण्यास सांगितलं, असं नितीश म्हणाले. 2024 च्या निवडणुकीसाठी नितीश यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर नितीश हातवारे करत म्हणाले की, मला काहीही बनण्याची इच्छा नाही.

भाजपची साथ सोडल्याचा योग्य निर्णय

भाजप सोडल्यानंतर देशभरातील पक्षांच्या लोकांनी आपल्याला फोन करून हा योग्य निर्णय असल्याचे सांगितले, असा दावाही नितीश यांनी केला. नितीश म्हणाले की, त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगितले की, सर्वांनी एकत्र लढले तर 2024ही जिंकू. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना नितीश म्हणाले की, दिल्लीतून काहीही केले जात नाही, केवळ प्रचार केला जात आहे, लोकांचे उत्पन्न कमी होत आहे, असं ते म्हणाले.

तेजस्वी यादव काय म्हणाले?

नितीश यांच्या आधी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं भाषण झालं. ते म्हणाले की, भाजपला 2024 ची भीती आहे. ते म्हणाले की 2024 मध्ये आम्ही 40 पैकी 40 जागा जिंकू (लोकसभा). भीतीपोटी भाजपला सभागृहात आमचा सामना करता आला नाही, तर त्यांनी सीबीआय, ईडी आणि आयटी या तीन जावयांना पाठवले आहे. बिहार, गुरुग्रामसह एकूण 24 ठिकाणी धाडी टाकण्यात आले. यावर ते बोलत होते.

26 ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे

फ्लोर टेस्टपूर्वीच बिहारमध्ये बराच गदारोळ झाला होता. सभापती विजय कुमार सिन्हा यांनी प्रथम राजीनामा देण्यास नकार दिला आणि नंतर आज फ्लोअर टेस्टपूर्वी राजीनामा दिला. यानंतर उपसभापती महेश्वर हजारी यांनी फ्लोअर टेस्ट घेतली. आता 26 ऑगस्टला विधानसभेच्या नवीन अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in