बंटी पाटील मुन्ना महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू देणार?, दोघांमधील संघर्ष कधी उफाळून आला?

Dhananjay Mahadik Vs Satej Patil, Rajya sabha Election : कुस्तीच्या आखाड्यातील मित्र असे बनले राजकीय प्रतिस्पर्धी
बंटी पाटील मुन्ना महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू देणार?, दोघांमधील संघर्ष कधी उफाळून आला?

कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की लगेच तोंडी येतात, ती म्हणजे सतेज (बंटी) पाटील आणि धनंजय (मुन्ना) महाडिक! कोल्हापुरात कुठलीही निवडणूक लागली की, राजकारण दोघांभोवती फेर धरायला लागतं. आताच या दोघांविषयी बोलण्याच कारण म्हणजे भाजपने धनंजय महाडिकांना राज्यसभेसाठी दिलेली उमेदवारी. आणि यालाच धरून उपस्थित होत असलेला एक प्रश्न की, बंटी पाटील यंदातरी धनंजय महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू देणार का?

तसं पाहिलं तर सतेज आणि धनंजय हे महादेवराव महाडिक यांच्या तालमीतले पैलवान. दोघांची मैत्रीही नावजलेली होती. पण नंतरचं करिअर हे एकमेकांच्या विरोधात गेलं. सुरुवात धनंजय महाडिकांनी केली. धनंजय महाडिक लोकसभेच्या मैदानात उतरले. 2004 सालीच शिवसेनेकडून लोकसभा लढवली. मात्र राष्ट्रवादीतल्या सदाशिवराव मंडलिकांनी 12 हजारांच्या फरकाने महाडिकांचा पराभव केला.

धनंजय महाडिकांनी जोरदार प्रवेश केल्यानंतर सतेज पाटील मैदानात राजकीय मैदानात उतरले. 2004 साली करवीर विधानसभा मतदार संघातून सतेज पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यावेळेचे आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकरांचा पराभव केला. विधानसभेत पाऊल ठेवलेल्या सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या राजकारणाची सुरूवात झाली ती अशी!

आता हे झाल्यावर परत 2009 च्या निवडणुका आल्या. 2004 मध्ये अपक्ष लढलेले सतेज पाटील यावेळी काँग्रेससोबत होते, तर 2004 मध्ये शिवसेनेकडून लढलेले धनंजय महाडिक 2009 च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीकडे गेले.

विधानसभेला सतेज पाटील आणि लोकसभेला धनंजय महाडिक असंच गणित सगळ्यांना वाटत होतं, पण दुधात खडा पडला आणि राष्ट्रवादीने धनंजय महाडिकांचं लोकसभेचं तिकीट कापलं. तिकीट न मिळण्याचं कारण सतेज पाटील असल्याचा संशय महाडिकांना आला आणि इथून पुढे दोन मित्रांमध्ये तूट पडली.

2009 मध्येच सतेज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून आमदारकी लढण्यास उतरले. यावेळी लोकसभेचं तिकीट कापल्याचा रागाने धनंजय महाडिकांनी पाटलांविरोधात अपक्ष अर्ज भरला, पण बाजी मारली ती सतेज पाटलांनी! सतेज पाटील विजयी झाले.

त्यानंतर 2014 चं निवडणुकांचं आलं. यावेळी आश्चर्य वाटावी अशी घटना घडली. या दोघांत हाडवैर जरी असलं तरी धनंजय महाडिकांनी लोकसभेसाठी सतेज पाटलांकडे मदत मागितली. त्यावेळी शपथेवर सतेज पाटलांनी मदत करायचं ठरवलं.

दोघांच्या ताकदीमुळे मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक लोकसभेवर जिंकून गेले, मात्र काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि इथंच खरा गेम झाला.

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटलांच्या विरोधात महाडिक बंधूंनी गेम केला. धनंजय महाडिकांचे चुलतभाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक भाजपकडून रिंगणात उतरले. तेही सतेज पाटलांच्या विरोधात. निकाल लागला तो बंटी पाटलांच्या विरोधात. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून सतेज पाटलांचा पराभव, तर अमल महाडिकांचा विजय झाला. लोकसभेत मदत करुनही विधानसभेत दगाफटका झाल्याच्या चर्चा पुन्हा उफाळून आल्या आणि दोघांतलं शत्रुत्व कमालीचं वाढलं.

विधानसभेत झालेल्या दग्याफटक्याने सतेज पाटील चांगलेच पेटून उठले. त्यानंतर आली 2015 ची विधान परिषद निवडणूक. याच विधान परिषदेत महादेवराव महाडिक हे तब्बल 18 वर्ष म्हणजेच 3 टर्म आमदार म्हणून निवडून गेले होते, मात्र याच वेळस सतेज पाटलांनी महाडिकांना विधान परिषदेत पोहोचूच दिलं नाही. सतेज पाटलांनी विधान परिषद निवडणुकीत महादेवराव महाडिकांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकी वेळी झालेल्या घाताचं उत्तर पाटलांनी विधान परिषदेवेळी दिलं.

त्यानंतर सतेज पाटलांनी महाडिकांना गुलाल उधळूच द्यायचं नाही, असं ठरवलं. 22 डिसेंबर 2017 रोजी कोल्हापूर पालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. सोबतीला शिवसेनेला घेतलं, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांनी टाकलेल्या डावामुळे महाडिक गटाकडे असलेली महापालिका पद्धतशीर रित्या सतेज पाटलांच्या ताब्यात गेली.

काँग्रेसचा महापौर झाला आणि राष्ट्रवादीचा उपमहापौर झाला. हा सतेज पाटलांनी महाडिकांना दिलेला दुसरा धक्का होता. यानंतर पुन्हा लागली 2019 ची विधान परिषद आणि विधान सभा निवडणूक.

2019 मध्ये सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील मैदानात उतरले. ज्या उमेदवाराने सतेज पाटलांना हरवलं, त्याच अमल महाडिकांना ऋतुराज पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आव्हान दिलं. अमल महाडिकांचा पराभव करत सतेज पाटलांनी महाडिकांना पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं.

विधानसभेनंतर 2019 च्या लोकसभेला राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक निवडणुकीत उतरले. त्यांच्या विरोधात होते शिवसेनेचे संजय मंडलिक. इथं धनंजय महाडिकांचा पराभव करण्यासाठी संजय मंडलिकांना 'आमचं ठरलंय' म्हणत सतेज पाटलांनी त्यांची राजकीय ताकद त्यांच्यामागे उभी केली आणि धनंजय महाडिकांना पराभव बघावा लागला.

कोल्हापुर जिल्ह्यासाठी महत्त्वाची असलेली गोकुळ दूध संघांच्या निवडणुकीतही सतेज पाटलांनी महाडिकांना सावरू दिलं नाही. 2021 मध्ये गोकुळ दुध संघाची निवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडीचं कुठलंच गणित लागू झालं नाही. यामध्ये फक्त सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशीच ही निवडणूक झाली. परिणाम झाला 21 पैकी सतेज पाटील गटाचे 19 उमेदवार विजयी झाले आणि पाटलांची एकहाती सत्ता गोकुळ दुध संघावर आली.

अगदी अलिकडेच झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही सतेज पाटलांनी 'आमचं ठरलंय' असा स्पष्ट संदेश दिला. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधवांच्या निधनानंतर त्या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री जाधवांना बिनविरोध निवडून द्यावं, असा विचार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा होता, पण भाजपने या जागेवर आपला उमेदवार दिला आणि निवडणूक झाली.

या निवडणुकीतही सतेज पाटील आणि धनंजय महाडिकांचं वर्चस्व पणाला लागलं होतं, पण बाजी मारली ती सतेज पाटलांनी. जयश्री जाधव जिंकून आल्या. एका विधानसभा निवडणुकीत झालेल्या दगाबाजीमुळे सतेज पाटलांनी महाडिकांना प्रत्येक ठिकाणी लोळवलं. कोल्हापूर महापालिका, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ दुध संघ आणि सध्याच झालेली पोट निवडणुकीतही सतेज पाटलांनी महाडिकांना गुलाल उधळूच दिला नाही.

आता राज्यसभेच्या लागलेल्या निवडणुकीतही सगळ्यांचं लक्ष कोल्हापूरकडं लागलंय. भाजपकडे दोन उमेदवार निवडून येतील इतकं संख्याबळ आहे, तर आघाडीतील तीन पक्षांकडे एक उमेदवार येईल इतकं. सहाव्या जागेवर शिवसेनेपाठोपाठ भाजपनं महाडिकांना उतरवलंय, त्यामुळे महाडिकांचं काय होणार याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. या आकड्यांच्या जुळवाजुळवीत महाडिकांना घरी बसवण्यासाठी सतेज पाटील काही वेगळी खेळी करणार हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in