‘…त्यावरून दंगली घडवल्या जातील’; संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र, सावरकरांवरून सवाल
“सावरकरांचा विचार विज्ञानवादीच होता. त्या विज्ञानवादाला मूठमाती देऊन ‘मोदी पक्ष’ पुन्हा देशाला अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विहिरीत ढकलत आहे. अशाने देश गुलामच होईल.”
ADVERTISEMENT

देशातील वाढत्या असहिष्णू वातावरण बोट ठेवत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपवर हल्ला चढवला. दुसरीकडे राज्यात काढण्यात येत असलेल्या सावरकर गौरव यात्रेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला सवाल केला आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून काही मुद्दे उपस्थित केले असून, देशात दंगली घडवल्या जातील, असा इशारा दिला आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत लेखात म्हणतात, “हिंदुस्थान इंग्रजांचा गुलाम झाला. कारण विज्ञानाची कास सोडून अंधश्रद्धा, भोंदुगिरी, जादुटोणा यामागे जनता लागली. भाजपने ’सावरकर गौरव यात्रा’ काढली. सावरकरांचा विचार विज्ञानवादीच होता. त्या विज्ञानवादाला मूठमाती देऊन ‘मोदी पक्ष’ पुन्हा देशाला अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विहिरीत ढकलत आहे. अशाने देश गुलामच होईल.”
“हिंदुस्थान गुलाम का झाला? यावर आतापर्यंत अनेक चर्चा घडल्या असतील, पण हिंदुस्थानने गुलामी का पत्करली याचे उत्तर देशातील आजच्या भाजप राजवटीत आहे. विज्ञानाची, आधुनिकतेची कास सोडून देशाला भोंदू बाबागिरीच्या मार्गाने नेणे हाच गुलामीचा मार्ग आहे. देशी लोकांत कमालीची वाढलेली अंधश्रद्धा, धर्मांधता, बुवागिरी यामुळे जनतेला गुलाम करून देश ताब्यात घेणे इंग्रजांना शक्य झाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष देश ताब्यात ठेवण्यासाठी तोच ब्रिटिश मार्ग अंगीकारत आहे. लोकांना बुवा, महाराज, अंगारे-धुपारे, मंदिर, मशीद, कथा वाचक, धर्म मेळे यांत गुंग ठेवून मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करायचे व त्याच ‘धुंद’ वातावरणात निवडणुका जिंकायच्या. जाती व धर्मात भांडणे लावण्याचे काम इंग्रजांनी केले. लोकांना भांडत ठेवले व इंग्रज देश लुटत राहिले. आता वेगळे काय सुरू आहे?”, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊतांनी ‘रोखठोक’मध्ये मांडलेले काही मुद्दे
-“आसामच्या भाजप आमदार रूपज्योती कुर्मी यांनी आता एक मागणी लावून धरली. ‘ताजमहाल आणि कुतुबमिनार तोडा व तेथे मंदिर बनवा. मी त्याकामी एक वर्षाचा पगार देते!’ आता ताजमहाल, कुतुबमिनार तोडण्यासाठी एखादी चळवळ उभी करून वातावरण तापवले जाईल. मूर्ख आणि बिनडोक लोक त्या चळवळीत सामील होतील, त्यावरून दंगली घडवल्या जातील. राजकारणी मजा पाहतील.”