गुलाबभाऊ सत्तेच्या जोरावर ३० वर्ष मलिदा खाल्ला तरी पाझर का फुटत नाही? सुषमा अंधारे

पाच आमदार गेले म्हणून जळगावमधील शिवसेनेची ताकद कमी झाली असं नाही...
Gulabrao Patil - Sushama Andhare
Gulabrao Patil - Sushama AndhareMumbai Tak

जळगाव : पाच आमदार शिंदे गटात गेले म्हणून जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी झाली असं नाही. सत्ता असतानाही यांना वाय प्लस सुरक्षा घेवून फिराव लागतं आहे. यातच काय ते उत्तर आलं, असं म्हणतं जळगावमध्ये शिवसेनेची ताकद अद्याप कायम असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे.

'त्याची' उत्तर तुमच्याकडे आहे का?

यावेळी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेवर उत्तर दिलं. सुषमा अंधारे या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेलं बाळ आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, सुषमा अंधारे तीन महिन्यांचा बाळ आहे का? सुषमा अंधारे टीका करते का? यापेक्षा सुषमा अंधारे तुम्हाला जे प्रश्न विचारते त्याची उत्तर तुमच्याकडे आहे का? असा प्रतिसवाल त्यांनी आमदार पाटील यांना केला.

होय मी टीका करत होते, मात्र एकदाही आम्ही उध्दव ठाकरे यांचा हात कधी सोडला नाही. पण गुलाब भाऊ तीस वर्ष सत्तेच्या जोरावर मलिदा खाल्ला तरी तुम्हाला पाझर का फुटत नाही, असा खोचक सवालही सुषमा अंधारे यांनी केला.

सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे, मात्र मुंबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळं करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. यात एकनाथ शिंदे अळीमिळी चूप करून बसले आहेत, याच वाईट वाटतं आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.

मुंबई महापालिका निवडणूक असो की आगामी निवडणुका. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. या दबाव तंत्राच्या विरोधात प्रत्येक शिवसैनिक हा हातात मशाल घेऊन पेटून उठलेला आहे. कुठल्याही दबाव तंत्राला बळी न पडता उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी ठामपणे विरोधात उभी आहे. किशोरीताई पेडणेकर असतील किंवा इतर अशा सर्वांवर दबाव तंत्र वापरण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. तुम्ही अस टार्गेट टार्गेट चा खेळ खेळत रहा, २०२४ च्या निवडणुकीत जनता तुम्हाला टार्गेट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

स्वागतार्थ लावलेले बॅनर लंपास :

दरम्यान, सुषमा अंधारे यांची ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्या ठिकाणी स्वागतार्थ बॅनर लावण्यात आले आहे. सोबतच कार्यकर्त्यांच्या वतीने सुषमा अंधारे यांच्या स्वागतार्थ पाळधी गावातही बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र हे बॅनर अज्ञातांनी लंपास केले असून यामुळे जळगावत राजकीय तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या वतीने अज्ञातांविरुद्ध पाळधी पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in