“दिल्लीवाल्यांची लाथ व फडणवीसांचा बुक्का”, एकनाथ शिंदेंवर ‘ठाकरें’चा हल्ला
संपादक उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही खडेबोल सुनावण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

Shivs Sena UBT On Ajit Pawar Revolt : “महाराष्ट्रात भाजपने जे केले त्यामुळे संपूर्ण देशात त्यांची छिः थू होत आहे. सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार हे चक्की पिसायला तुरुंगात जातील अशी गर्जना देवेंद्र फडणवीस वारंवार करीत होते, पण त्याच अजित पवारांनी फडणवीस यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व सोमवारी हे ‘चक्की पिसिंग’ फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर त्यांच्या गटाचे खातेवाटप करीत बसले, आश्चर्यच आहे!”, असा चिमटा काढत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही डिवचलं आहे.
शिवसेनेने (युबीटी) सामनात “एक (डाऊट) फुल; दोन हाफ!” मथळ्याखाली अग्रलेख लिहिला असून, यात देवेंद्र फडणवीसांबरोबरच एकनाथ शिंदेंनाही टोले लगावले आहेत. “खातेवाटपाची चर्चा मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ बंगल्यावर व्हायला हवी होती, पण अजित पवार व त्यांचा गट पोहोचला ‘सागर’वर. हे आश्चर्यच म्हणायला हवे. मुख्यमंत्र्यांची ही अशी अवस्था केविलवाणी आहे व दिवसेंदिवस ती अधिकच दयनीय होत जाईल”, असं ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलं आहे.
‘गुलाबो पाटील, दिपू केसरकर’, ठाकरेंचा वार
पुढे असं म्हटलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांमुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली, असे गरजणारे मिंधे गटाचे एक मंत्री गुलाबो पाटील हे राजभवनात अजित पवारांच्या चरणांवर लोटांगण घालायचेच काय ते बाकी होते. राष्ट्रवादीमुळे शिवसेना सोडली व त्यांच्याच पायाशी लोटांगण घालणाऱ्या या ओशाळवाण्या चेहऱ्यांकडे पाहून जनता हसत होती. राष्ट्रवादी आमच्याबरोबर सत्तेत सहभागी झाली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे गरजणारे मिंधे गटाचे सर्व प्रवक्ते अचानक गायब झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची तर वाचाच गेली आहे.”
वाचा >> Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट, फायदा होणार काँग्रेसला
“मिंध्यांचे एक मंत्री सावंतवाडीचे दिपू केसरकर यांनी पंधरा दिवसांपूर्वीच सांगितले होते, ‘बंड फसले असते तर शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यावर पिस्तुल चालवले असते. त्यांची तेव्हाची मानसिक अवस्था फारच खराब होती.’ पण अजित पवारांच्या शपथ ग्रहणानंतर मुख्यमंत्र्यांची मानसिक अवस्था सुरत व गुवाहाटीपेक्षा जास्तच बिघडली असेल. म्हणून गृहमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगल्यावरील सर्व शस्त्रे लगेच सरकारजमा केली पाहिजेत”, असा उपरोधिक सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांना दिलाय.