भाजपकडून वीज बिल वाटप करणाऱ्या तरुणाला उमेदवारी, आई धुणी-भांडी करते, तर वडील वॉचमन
Akola Mahapalika election 2026 : अनेक ठिकाणी जुने, निष्ठावान कार्यकर्ते डावलले गेल्याची तक्रार होत असताना, दुसरीकडे इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना किंवा राजकीय घराण्यांतील व्यक्तींना तिकीट दिल्याने भाजपवर टीकेची झोड उठली आहे. मात्र, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील भाजपच्या एका निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपकडून वीज बिल वाटप करणाऱ्या तरुणाला उमेदवारी
आई धुणी-भांडी करते, तर वडील वॉचमन
धनंजय साबळे, Akola Mahapalika election 2026 : राज्यात सध्या भाजपच्या उमेदवारी देण्यावरून जोरदार चर्चा आणि राजकीय वाद रंगले आहेत. अनेक ठिकाणी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना किंवा राजकीय घराण्यांतील व्यक्तींना तिकीट दिल्याने भाजपवर टीकेची झोड उठली आहे. मात्र, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील भाजपच्या एका निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर भाजपने मंगेश झिने या हलाखीची परिस्थिती असणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही चर्चेचा विषय ठरली आहे. कारण मंगेश झिने हे ना कोणत्या मोठ्या नेत्याचे नातेवाईक आहेत, ना त्यांच्या मागे पैसा किंवा ताकदवान गट आहे. मंगेश झिने हे अकोल्यातील खडकी भागात राहणारे एक सामान्य नागरिक असून गेल्या दहा वर्षांपासून ते महावितरणचे वीजबिल वाटप करण्याचे काम करत आहेत. त्यांची आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करते, तर वडील चौकीदारीचे काम करतात. संपूर्ण कुटुंब एका खोलीच्या भाड्याच्या घरात राहते. रोजच्या जगण्याची धडपड करणारे हे गरीब कुटुंब अचानक राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
हेही वाचा : बिघडलेला गाव सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते; विश्वास पाटील नेमकं काय म्हणाले?
भाजपने मंगेश झिने यांना तिकीट देताना अकोला महानगरपालिकेतील भाजपचा एक मोठा आणि परिचित चेहरा असलेल्या विजय इंगळे यांचे तिकीट कापले. विजय इंगळे हे चार वेळा नगरसेवक राहिले असून, त्यांच्या तिकीट कापण्याच्या निर्णयामुळे शहरात खळबळ उडाली. नाराज झालेल्या विजय इंगळे यांनी बंडखोरी करत थेट ठाकरे गटाची उमेदवारी स्वीकारली आहे. त्यामुळे हा प्रभाग अधिकच चुरशीचा बनला आहे.










