शरद पवारांबद्दलच्या ‘त्या’ ट्विट्सनी अरविंद केजरीवालांचा ‘गेम’ केला!
अरविंद केजरीवाल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर केजरीवाल यांचे जुने ट्विट्स व्हायरल झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे, अंजली दमानिया यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT

‘दिल्लीतील लोकांच्या विरोधात मोदी सरकारने काढलेला काळा अध्यादेश आपल्या सगळ्यांना मिळून संसदेत रोखायचा आहे. याच मुद्द्यावर आज मुंबईत काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवारांसोबत भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार राज्यसभेत दिल्लीतील लोकांची साथ देणार आहेत. दिल्लीकरांच्या वतीने मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे आभार मानतो. लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई आम्ही एकजूटीने लढू”, हे विधान आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचं! केजरीवाल यांनी शरद पवारांचे आभार मानले, पण नंतर खरं राजकारण सुरू झालं. त्याला कारणीभूत ठरलंय केजरीवालांचे जुने ट्विट्स. त्यावरूनच भाजपने केजरीवालांना खिंडीत पकडलं.
अरविंद केजरीवाल यांच्या शरद पवार यांच्या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्विट केलं. हे ट्विट करताना केजरीवालांचं जुनं ट्विटही शेअर केलं. त्यानंतर बावनकुळेंनी म्हटलं आहे की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 9 मे 2012 रोजी एक ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘बेईमान ‘ म्हटले होते.”
“पवारांचे स्विस बँकेत खाते असून त्याबाबतची माहिती आम्ही जनतेसमोर आणू असा इशारा देखील केजरीवाल यांनी दिला होता. पवारांची जागा तुरुंगात आहे, अशी टीका सुद्धा केजरीवाल यांनी केली होती. आणि आज अचानक केजरीवाल यांना शरद पवार प्रामाणिक वाटू लागले, ते देशातील आदरणीय नेते असल्याचा साक्षात्कार देखील केजरीवालांना आता झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विरोध करण्यासाठी विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे केजरीवाल आणि पवार यांची आजची भेट होय”, असं बावनकुळे म्हणाले.