'अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद', फडणवीसांनी शाहांना रात्री 2 वाजता का केलेला फोन?
Maharashtra political story : उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये काय झालं होतं बोलणं, अमित शाहांनी सांगितलेली इनसाईड स्टोरी काय?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री वाद
उद्धव ठाकरेंनी पुन्हा घेतली शपथ
अमित शाहांनी २०२२ मध्ये काय केलेला खुलासा
Uddahv Thackeray Amit Shah : "तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शाह यांनी मला सांगितलं होतं की अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ. 2019 साली अमित शाह यांनी शब्द दिला होता; पण तो शब्द त्यांनी पाळला नाही. ते खोटे बोलत आहेत." हे विधान उद्धव ठाकरे यांचं. याच विधानाने २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या सत्तेच्या वाटाघाटीच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटलं आहे.
ADVERTISEMENT
ज्यावेळी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी अडीच-वर्ष मुख्यमंत्री पदाबद्दलचा उल्लेख केला होता. त्यावर अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात असताना सविस्तर भूमिका मांडली होती आणि हा दावाही फेटाळून लावला होता. उद्धव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये काय चर्चा झाल्या होत्या. पडद्यामागे काय घडलं होतं? याबद्दल शाहांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या भाजपच्या बैठकीत स्पष्टीकरण दिले होते.
हेही वाचा >> "नाहीतर शिवसेनेची मते भाजपला मिळणार नाही", शिंदेंनी शाहांना काय सांगितलं?
शाह यांनी सांगितलेलं की, 2014 मध्ये केवळ दोन जागांच्या हट्टापायी शिवसेनेने युती तोडली. युती तोडून आपण जास्त जागा जिंकू आणि मुख्यमंत्रीपद मिळवू असे खयाली पुलाव ते शिजवत होते; पण भाजपच्या जवळपास दुप्पट जागा आल्या. शिवसेना भाजपपेक्षा लहान पक्ष झाला. ते आम्ही नाही केले, त्यांनीच युती तोडून पायावर दगड मारून घेतला."
हे वाचलं का?
"उद्धव ठाकरे यांचा अहंकार त्यावेळी आडवा आला. निकालानंतर शिवसेना सुरुवातीला आमच्यासोबत आली नाही. आम्ही ठरवून टाकले की अटलजींसारखे तेरा दिवसांचे का होईना; पण सरकार आणायचेच. फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. आमच्याकडे बहुमत नव्हते; पण मग शिवसेनेची मजबुरी होती, ते आमच्यासोबत आले आणि सरकार पाच वर्षे टिकले", असे शाह यांनी सांगितलेले.
शाह यांना फडणवीसांनी का केलेला मध्यरात्री फोन
फडणवीस आणि ठाकरेंमध्ये झालेल्या चर्चेबद्दलही शाहांनी खुलासा केलेला. त्यांनी सांगितलेलं की, "2019 मध्ये एकदा रात्री दोन वाजताच्या सुमारास मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. ही गोष्ट लोकसभा निवडणुकीच्या आधीची आहे. 'लोकसभा, विधानसभेची युतीची बोलणी एकत्रितच करा आणि आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्या असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत', असे फडणवीस माझ्याशी बोलले. मी कधी नशापाणी करीत नाही", असे पडद्यामागे घडल्याचा दावा शाहांनी केलेला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "शरद पवार आजपर्यंत हेच करत आलेत", राज ठाकरेंची फटकेबाजी
याबद्दलच शाहांनी पुढे सांगितलेलं की, "मी त्यांना बजावून सांगितले की, मुख्यमंत्रिपद त्यांना मिळणार नाही. युती तुटली तरी चालेल; पण तरीही आपल्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांना बोलून घ्यायला सांगा, असे मी फडणवीसांना सांगितले. त्यानुसार ठाकरे आमच्या नेतृत्वाशी (नरेंद्र मोदी) बोलले. त्यानुसार पाचही वर्षे भाजपकडेच मुख्यमंत्रिपद राहील, असे ठरले", असे शाहांनी सांगितलेलं.
ADVERTISEMENT
"...तर मी युती तोडेल"
"2019 मध्ये युतीची घोषणा करण्यासाठी मी मुंबईत आलो. मी उद्धव ठाकरेंना फोन केला. पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याचे ठरले. पत्रकार परिषदेत काय बोलायचे तेही आमचे ठरले. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाबाबत आपण काहीही बोललात तर मी युती तोडेल, असे मी त्यांना बजावून सांगितले होते. ते म्हणाले, मी मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही बोलणार नाही. ते बोलले देखील नाहीत. बंद दाराआड आमचे काहीही ठरलेले नव्हते, आमचे जे काही असते ते सगळे उघड; सार्वजनिक असते", असा खुलासा शाह यांनी ठाकरेंनी केलेल्या आरोपावर केला होता. पण, आता ठाकरेंनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केल्याने त्यावरून राजकारण तापलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीच याला दुजोरा दिला आहे. "उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेत अमित शाह खोटं बोलतायत असं सांगितलं. तसंच भाजपासोबत युतीत असताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते खरं आहे. त्यांनी तुळजाभवानीची जी शपथ घेतली तीदेखील खरी आहे. सुरुवातीची अडीच वर्षे भाजपा मुख्यमंत्रिपद घेणार होती. त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे असणार होते", असे शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे या मुद्द्याला नव्याने फोडणी मिळाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT