“लाल किल्ल्यासारखा संवेदनशील परिसरात…”, शरद पवारांची मोदी-शाहांकडे ‘ही’ मागणी
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर शरद पवार यांनी ट्वीट करून या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्लीः दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग येथील ट्रॅफिक सिग्नल परिसरात एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रतिक्रिया दिली असून, केंद्र सरकारकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
शरद पवारांनी केली ‘ही’ मागणी
10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता i20 कारमध्ये स्फोट झाला, ज्यामुळे परिसरातील काही वाहने जळाली आणि काही पादचारी जखमी झाले. ही घटना लाल किल्ल्याजवळील संवेदनशील परिसरात घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दिल्ली पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इतर तपास यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू आहे. या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
शरद पवार यांचे ट्वीट
शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये या घटनेचे वर्णन "अतीव दुःखद" आणि "चिंताजनक" असे केले आहे. त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. "लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात ही दुर्दैवी घटना घडणे फारच चिंताजनक आहे."
शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, चौकशी अहवाल देशासमोर ठेवला जावा आणि त्यानुसार केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणांनी अशा घटना रोखण्यासाठी ठोस सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात.










